पुणे,14 जुलै 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांच्या टीमने रोबोटिक थोरॅसिक शस्त्रक्रियेद्वारे 28 वर्षीय पुरूष रूग्णाच्या छातीच्या वरच्या भागात असलेला दुर्मिळ ट्युमर काढण्यात यश मिळविले.एका दुकानात काम करणाऱ्या या तरूणाला मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा आजार काही महिन्यांपासून होता. मायस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे गंभीर प्रकारचा व चेतातंतू व स्नायूंशी निगडीत (न्युरोमस्क्युलर) स्वयंप्रतिरोधक आजार आहे.यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा निर्माण होतो आणि अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो.
तर दुसरीकडे थायमोमा हा ट्युमर थायमस ग्रंथीमध्ये विकसित होऊ शकतो आणि यामुळे प्रतिपिंडे तयार होऊ शकतात. या दोन्ही स्थितींचा प्रत्येक वेळेस संबंध नसला तरी काही वेळा संबंध असू शकतो.हा रुग्ण मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजारासाठी नोबल हॉस्पिटलमधील न्युरोलॉजिस्ट डॉ.श्रीपाद पुजारी यांच्याकडे उपचार घेत होता.त्याचे स्नायू अधिक कमकुवत होत होते आणि अशक्तपणा वाढत होता.त्यामुळे डॉक्टर पुजारींच्या सल्ल्याने काही निदान चाचण्या घेण्यात आल्या.त्यामध्ये सीटी स्कॅन,पेट स्कॅन व प्रतिपिंडांसाठी काही चाचण्यांचा समावेश होता. यातून थायमोमा या थायमस ग्रंथीमध्ये विकसित झालेल्या दुर्मिळ ट्युमरचे निदान झाले.थायमस ग्रंथी ही छातीची भिंत आणि हृदय यांच्यामधील भागात स्थित एक छोटा अवयव असतो.
याबाबत बोलताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील आँकोसर्जन डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की,या रूग्णाला खूप अशक्तपणा आला होता आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने नॉन- इनवेसिव्ह व्हेंटीलेटर चे साहाय्य देण्यात आले.ट्युमरचे निदान झाल्यावर थायमस ग्रंथी आणि ट्युमर काढण्यासाठी रॅडिकल थायमेक्टोमी ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.ही ग्रंथी हृदयाच्या सर्व महत्त्वाच्या वाहिन्यांच्या जवळ असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक जोखीमकारक व आव्हानात्मक होती.अशा वेळेस खुली शस्त्रक्रिया अधिक जोखीमकारक ठरू शकते म्हणूनच आम्ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
ते पुढे म्हणाले की,या प्रक्रियेमध्ये आम्ही तीन छोटी छिद्रे केली.तीन रोबोटिक आर्म्सच्या माध्यमातून ट्युब आणि कॅमेरा आतमध्ये नेण्यात आला.रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये आतील प्रतिमा लक्षणीयरित्या मोठी दिसते.यामुळे शस्त्रक्रिया करायचा भाग आणि आजूबाजूला असलेल्या नसा याच्या स्पष्ट त्रिमिती प्रतिमा दिसतात.रोबोटिक प्रणालीला 360 अंशाचे असलेले भ्रमण यामुळे अधिक अचूकता साधता येते.रोबोटिक प्रणालीमुळे कमीत कमी रक्तस्त्राव किंवा गुंतागुंत होते आणि यामुळे रूग्ण लवकर बरा होतो आणि रूग्णालयातील वास्तव्य कमी होते.मात्र ट्युमरची स्थिती लक्षात घेता या प्रक्रियेमध्ये जोखीम होती. आजूबाजूच्या नसांना धक्का लागल्यास पोटातील उदरपटल (डायफ्रॅम) यावर परिणाम झाला असता.यामुळेच रोबोटिक शस्त्रक्रिया महत्त्वाची होती.
6 सेमी लांबीची ही गाठ काढण्यासाठी सुमारे चार तास लागले.त्यानंतर आम्ही ही गाठ बायोप्सीसाठी पाठवली आहे,ज्यावरून ही कर्करोगग्रस्त आहे की नाही हे कळेल.कर्करोगग्रस्त असल्यास रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीसारख्या पुढील उपचारांसाठी सल्ला दिला जाऊ शकतो.रूग्णाची तब्येत बरी असून प्रगतीपथावर आहे.
अशा प्रकारची स्थिती हाताळण्यात सांघिक कार्य आवश्यक असते. नोबल हॉस्पिटलच्या टीममध्ये आँकोसर्जन डॉ.आशिष पोखरकर, डॉ.उमेश पापुरनिया,डॉ.भूषण, वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट डॉ.श्रीपाद पुजारी व वरिष्ठ भूलतज्ञ डॉ.गीतांजली आखाडे-दांगट , डॉ.श्रुती वालावलकर,डॉ.संगीता चंद्रशेखर व भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एच.के.साळे यांचा समावेश होता. एसएसआय मंत्रा 3.0 रोबोटिक सर्जिकल सिस्टिम वापरून नोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली ही पहिली लेफ्ट थोरॅसिक मिडियास्टिनल ट्युमर एक्सिशन प्रक्रिया आहे.
अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेत रूग्णाच्या श्वसनमार्गाचे,वायुवीजनाचे (व्हेंटीलेशन) आणि एकूण शारीरिक स्थितीचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते आणि यामध्ये भूलतज्ञांची भूमिका महत्त्वाची असते. अशा प्रक्रियांमध्ये एका फुफ्फुसाला प्राणवायू पुरविला जातो,तर दुसऱ्याचा खंडित केला जातो,जेणे करून शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रिया करणे सोपे जाते.नोबल हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ भूलतज्ञ डॉ.गीतांजली आखाडे-दांगट म्हणाल्या की,रूग्णाच्या स्नायूंचा कमकुवतपणा आणि न्युरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंटसच्या वाढत्या संवेदनशीलतेमुळे स्नायू शिथिलतेची योग्य पातळी राखण्यासाठी भूल नियंत्रित आणि अचूक मात्रेने देणे महत्त्वाचे असते.या प्रक्रियेतील आव्हानात्मक बाब म्हणजे ट्युमर फुफ्फुसांच्या खूप जवळ होता,प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्तदाब आणि हृदयाची गती बदलत होती.या सर्वांचे व्यवस्थापन योग्य ठेवले गेले. शस्त्रक्रियेच्या शेवटी सोनोग्राफी – मार्गदर्शित मणक्याच्या जवळ वेदनाशामक ब्लॉक (ॲनेस्थेशिया) देण्यात आला,जो शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे.शस्त्रक्रिया झाल्यावर श्वासपटलाची हालचाल पाहून लगेचच श्वसन मार्गात घातलेली नळी काढण्यात यश आले(एक्सट्युबेट). अशा रूग्णांना शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ व्हेंटिलेटरच्या आधाराची खूप शक्यता असते.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, नोबल हॉस्पिटलने डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील पहिली एसएसआय मंत्रा 3.0 रोबोटिक सर्जिकल सिस्टिम प्रस्थापित केली होती.ही एक अद्ययावत व अभिनव प्रणाली असून यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अधिक कार्यक्षमता व अचूकता साध्य होते व रूग्णांना चांगले परिणाम मिळतात.ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत आम्ही ३० हुन अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत.नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत रूग्णांसाठी प्रक्रियांमध्ये अधिक अचूकता व परिणामकारकता साधण्यास आम्ही कटि
बध्द आहोत.


