पुणे दि. 15 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) तृप्ती थापा आणि मोहिनी मांडके या दोन विद्यार्थिनींना नॅशनल असोसिएशन ऑफ स्टूडंट्स ऑफ आर्किटेक्चर (एनएएसए) उर्फ ‘नासा इंडिया’ तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना बीएनसीएचे प्राध्यापक महेश बांगड यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
बीएनसीएमध्ये चौथ्या वर्षात शिकणाऱ्या तृप्ती थापाला ‘नासा इंडिया’तर्फे गेल्या शैक्षणिक वर्षात (2024-25) नेत्तृत्व गुणाबद्दल सुवर्णपदक देण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2025-26) तिची निवड नासाच्या विभाग तीनसाठी विभागीय अध्यक्ष म्हणून एक वर्षासाठी करण्यात आली. तिच्या कार्यकक्षेत मुंबई वगळता महाराष्ट्रातली सर्व 40 वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) महाविद्यालयांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी येतात.
याशिवाय बीएनसीएमधील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मोहिनी मांडके हिला ‘नासा इंडिया’तर्फे तिच्या गतवर्षीच्या (2023-24) कार्याबद्दल ‘वर्षभरातील सर्वोत्तम विद्यार्थी’ (स्टूडंट ऑफ द इयर) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये प्रमाणपत्र आणि अकरा हजार रुपयांचा समावेश आहे. त्यासाठी देशभरातील सर्व 320 वास्तू रचनाशास्त्र महाविद्यालयांसाठी करण्यात आलेल्या स्पर्धेचे आयोजन ‘नासा इंडिया’तर्फे; तर त्याचे मार्गदर्शन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने (सीओए) केले होते.
बीएनसीएसचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी तृप्ती थापा आणि मोहिनी मांडके यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, गेली दोन दशके ‘नासा इडिया’च्या स्पर्धेतील सातत्यपूर्ण सहभागातून बीएनसीएच्या विद्यार्थिनींना गौरवण्यात आले आहे.तृप्ती थापा आणि मोहिनी मांडके यांनाही या निमित्ताने देशभरातील हुषार विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली.
प्रा. बांगड म्हणाले की, या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेतून आमच्या या दोन्ही विद्यार्थिनींमधील नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागत आहे, हा आनंद मोठा आहे.


