पुणे 16 जुलै
महाराष्ट्रातील ज्यूदोची चौफेर प्रगती करून राज्यात ज्यूदो हा खेळ आणि त्याचे खेळाडू वाढविणाऱ्या व्यक्तित्वाला आज महाज्यूदो परिवार मुकला आहे या शब्दात महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव दत्ता आफळे यांनी कै. दीपक टिळक यांना आदरांजली वाहिली.
आफळे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्यूदो सर्वदूर पोहोचवण्या-रुजवण्यासाठी दीपक टिळक सेन्से यांनी अविरत प्रयत्न केले. कोल्हापूर, औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजी नगर) बीड, सांगली या आणि अशा अनेक जिल्ह्यात दीपक टिळक सेन्से स्वतः जाऊन त्यांनी तेथें खेळाडू तयार केले आणि प्रत्येक ठिकाणी संघटना बांधल्या. राज्यात ब्लॅकबेल्टधारक प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी अनेक शिबिराचे आयोजन त्यांनी केले तसेच राष्ट्रीय परीक्षाही पुण्यांत अयोजिली होती.
यांसह राज्यात राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचेही आयोजन करण्यांत त्यांचा पुढाकार होता.
जपान येथे त्यांच्यासह त्यांच्या बरोबरीचे तत्कालीन खेळाडू घेऊन जात त्यांनी उच्च प्रशिक्षण घेतले आणि त्या कौशल्याचे राज्यातील खेळाडूंना भारतात परत आल्यावर प्रशिक्षण दिले.
राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल सेक्रेटरी म्हणून पद भूषविलेले आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे देशात हळहळ व्यक्त होत असून डॉ दीपक टिळक यांच्या जाण्याने ज्यूदो खेळाची हानी झाली असल्याची भावना राज्यातील संघटनांनी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमातून व्यक्त केली आहे.


