पुणे, दि. २९ : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीकरिता ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एकूण १५ मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून शिरूर आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी २ व उर्वरित ११ तालुक्यामध्ये प्रति तालुका १ प्रयोगशाळांच्या उभारणीस शासनाद्वारे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीस शासनातर्फे १ लाख ५० हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेची मृद नमुने तपासणी क्षमता वार्षिक ३ हजार असणार असून प्रथम ३०० मृद नमुने तपासणीस प्रति मृद नमुना ३०० रूपये, मृद व आरोग्य सुपीकता कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त पुढील ५०० मृद नमुन्यांसाठी प्रति मृद नमुन्यासाठी २० रुपये प्रोत्साहन तसेच उर्वरित मृद नमुने त्या प्रयोगशाळेने स्वबळावर शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या शासकीय दरानुसार शुल्क आकारणी करून तपासणी करून द्यावे लागणार आहे.
वैयक्तिकरित्या मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणी करणाऱ्या युवक, युवतीचे वय १८ ते २७ वर्ष असावे. लाभार्थी उद्योजक विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असलेला १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार, उद्योजक गटाकडे स्वतःची किंवा किमान चार वर्षांसाठी भाडेपट्टा करारासह भाड्याने घेतलेली इमारत असावी. शेतकरी उत्पादक संस्था कृषी चिकित्सालय आणि कृषी व्यवसाय केंद्रे, कृषी आवश्यक, माजी सैनिक, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था गट, शेतकरी सहकारी संस्था, किरकोळ निविष्ठा विक्रेते आणि शाळा, महाविद्यायीन युवक, युवतींना अर्ज करता येणार आहे.
अर्जाची छाननी जिल्हा यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून जिल्हास्तरीय समितीद्वारा पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. अर्जदाराने अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी जोडावी. अधिक माहितीकरिता www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अधिकाधिक इच्छुकांनी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन श्री. काचाळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000


