पुणे, 7 ऑगस्ट 2025: एटेनेक्स ह्या संस्थेच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी एटेनेक्स इंडिपेंडन्स डे रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सलग तिसऱ्या वर्षी करण्यात आले आहे. कोथरूड येथील केशवबागपासून सुरू होणाऱ्या ह्या स्पर्धेत पुणे शहरातील तीन हजाराहून अधिक धावपटू सहभागी होणार असून ह्या मॅरेथॉनमधून सामाजिक ऐक्य, स्वातंत्र्य व तंदुरुस्ती या तीन तत्त्वांचा उद्घोष करण्यात येणार आहे.
ह्यावर्षी इंडिपेंडन्स डे रन स्पर्धेसाठी ‘फोर्जा फुटबॉल क्लब’ ह्यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. त्यामुळे ही स्पर्धा ‘फोर्जा पुरस्कृत एटेनेक्स इंडिपेंडन्स डे रन 3.0’ म्हणून ओळखली जाणार आहे. ह्यातून दोन्ही संस्थांची युवकांच्या पायाभूत तंदुरुस्ती व क्रीडाक्षेत्राशी असणारी बांधिलकी अधोरेखित होणार आहे. तसेच, ह्या स्पर्धेला व्हीजे स्पोर्ट्स वाघोली, संस्कृती प्रतिष्ठान आणि डबीर प्रेसिटेक हे सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत.
एटेनेक्स संस्थेचे संस्थापक आदित्य गणेशवाडे म्हणाले की, यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केवळ स्वतंत्रतेचाच नव्हे तर सर्व वयोगटासाठी तंदुरुस्तीचे महत्त्व नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या स्पर्धेमधील विनामूल्य वॉकेथॉन शर्यतीत 200 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सहभागी होणार असून त्यातून सामाजिक चळवळ आणि देशाभिमान ह्यांचे महत्त्व आम्ही सांगत आहोत.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व पद्मश्री भायचुंग भुतिया यावेळी म्हणाले की, अशा मॅरेथॉन स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राचे महत्त्व नागरिकांच्या मनात ठसवण्यास मदत होते. तसेच त्यातून त्यांना प्रेरणाही मिळते. मी या स्पर्धेचा एक भाग असल्याचा मला आनंद होत आहे.
ह्या स्पर्धेत 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, फन रन आणि किड्स रन अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रत्येक धावपटूला एटेनेक्स टी-शर्ट, गुडी बॅग ह्याबरोबरच ब्रेकफास्ट, हायड्रेशन सपोर्ट, रूट सपोर्ट, गिफ्ट व्हाउचर, इ सर्टिफिकेट, शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला फिनिशर मेडल देण्यात येणार आहे.
10 दहा किलोमीटर अंतराच्या मुख्य शर्यतीचा प्रारंभ केशवबाग येथून होणार असून मातोश्री चौक, नळ स्टॉप, दशभुजा गणपती, करिश्मा चौक करत, कर्वे पुतळा येथून यू टर्न, पुन्हा करिश्मा चौक, दशभुजा गणपती चौक, नळ स्टॉप चौक पार करून सोनल हॉल चौक येथे यु-टर्न आणि पुन्हा नळ स्टॉपला डावीकडे वळून म्हात्रे पूल, तिथून उजवीकडे वळून डीपी रोडवरून केशवबाग येथे समाप्त होणार आहे. तर, 5 किमीसाठी केशवबाग येथून सुरुवात करून राजाराम पुलाकडे डावीकडे वळून राजाराम पुलाजवळ यु-टर्न घेऊन सरळ मातोश्री वृद्धाश्रम चौक, तिथून उजवीकडे वळून थेट म्हात्रे पूल, डावीकडे वळून नळ स्टॉप आणि तिथे यु-टर्न घेऊन पुन्हा डीपी रोडमार्गे सरळ केशवबाग येथे समाप्त होणार आहे.
स्पर्धेत 10किमी शर्यतीतील विजेत्यांना करंडक व 50,000/- रुपये, तर उपविजेत्याना करंडक व 15,000/- आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याला करंडक व 7,500/- अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. ह्याशिवाय स्पर्धेला फ्रिडो(कम्फर्ट पार्टनर), केशवबाग(व्हेन्यू पार्टनर), जोशी किचन(फूड पार्टनर), बीयू भंडारी(मोबिलिटी पार्टनर), एनरूट(न्यूट्रिशन पार्टनर), कुराडॉर(फिजिओ पार्टनर), जीआरसी असोसिएटस्, एम स्क्वेअर, वन लिटिल फार्म, आरव्हीके रिअल्टी, एसएमपी ह्यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.


