पुणे, दि. 14: लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा अभियानास शहरात देशभक्ती जनजागृतीपर उपक्रमात 16 हजार 61 नागरिकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
आयएनएस शिवाजी नेव्हल बँड पथक व लोणावळा नगरपरिषद यांच्या सहकार्याने शहरातील विविध शाळेत देशभक्तीपर संगीतवाद्य कार्यक्रम व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी देशभक्तीपर मार्गदर्शन शिबराचे आयोजित करण्यात आले. यामध्ये नौदल सैनिक, नागरिक, विद्यार्थी असे एकूण 5 हजार 746 सहभागी झाले. मीरा बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्यावतीने तिरंगा राखी कार्यशाळा आयोजित करुन यामध्ये तयार करण्यात आलेल्या राख्या भारतीय सैनिकांना सुपूर्द करण्यात आल्या.
लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता आयोजित आरोग्य शिबीरात नेत्र तपासणी व महिला कर्मचारी यांची स्तनपान तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. एकूण 1 हजार 140 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरात हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम, सफाई कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, शाळा स्तरावर चित्रकला, रांगोळी, तिरंगा राखी बनविणे, प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत यांच्या मार्फत तिरंगा राखी बनविणे उपक्रम राबविण्यात आले. विविध 17 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 7 हजार 419 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, याकरिता सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता लागणारे आवश्यक साहित्य पुरविण्यात आले, अशी माहिती साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
00000


