पुणे : शिस्तबद्ध संचलन करणारे विद्यार्थी…ढोल ताशांचा गजर…भगवे झेंडे…’बाजीराव पेशव्यांचा विजय असो’ अशा घोषणा देत असताना घोड्यांच्या टापांचा नाद ऐकू आला आणि शोभायात्रेत घोड्यावर स्वार झालेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सामील झाले. भगवे झेंडे, चौघडा वादन ढोल-ताशांच्या गजरात शनिवारवाड्याच्या दरवाज्यातून पुन्हा एकदा बाजीराव पेशवे शनिवारवाड्यावर अवतरले. त्यांच्यासह मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या देशातील कलाकारांना पाहून शनिवारवाड्यावर पेशव्यांचा इतिहास पुन्हा अवतरल्याची अनुभूती पुणेकरांना झाली.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमणबाग प्रशालेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे ‘रणधुरंधर बाजीराव पेशवे’ या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ लेखक शाम भुर्के , प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ.शरद आगरखेडकर, पेशवे कुटुंबीय, पांडुरंग बलकवडे, अशोक गुंदेचा, मिलिंद एकबोटे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी श्रीरसागर, माधव गांगल, विश्वनाथ भालेराव, चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे, डाॅ. सचिन बोधनी यावेळी उपस्थित होते.
कुंदन कुमार साठे म्हणाले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे फक्त युद्धकुशल सेनानी नव्हते, तर दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांचे आयुष्य हे ‘धाडस आणि शौर्याचा इतिहास’ आहे. इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीला कळावे आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शनिवारवाड्यावर पोहोचल्यावर सामूहिक महाराष्ट्र गीताचे गायन झाले. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेने बर्ची नृत्य सादर केले. परशुराम वाद्यपथकाने वादन केले. रमणबाग प्रशाला, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड), नु. म. वि., रेणुका स्वरूप, ज्ञानप्रबोधिनी (पुणे), ज्ञानप्रबोधिनी (निगडी), आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा तसेच भाऊसाहेब हिरे हायस्कूल या शाळांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेने संचलनाने अभिवादन केले. बाजीराव पेशवे ( अभिषेक जाधव ) मल्हारराव होळकर ( वेदांत कठाळे) व राणोजी शिंदे ( ईश्वर शेळके ) हे ऐतिहासिक पोषाखात अश्वारूढ होऊन सहभागी झाले होते.


