कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा व पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा ३७वे वर्ष २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दिमाखात साजरे करीत आहे. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाप्रमाणेच बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन येथे सलग १० दिवस सांकृतिक कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलमधील बालगंधर्व रंगमंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख मोहन टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सतीश देसाई आणि विविध कार्यक्रमांचे समन्वयक उपस्थित होते.
खास महिलांसाठी लावणी, पद्मश्री हेमामालिनी यांच्यावर चित्रित ड्रीम गर्ल’गाण्यांचा कार्यक्रम, उगवते तारे, इंद्रधनु, हिंदी हास्यकवी संमेलन, व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल, भारती विद्यापीठाने सादर केलेला ‘आविष्कार भारती’, हिंदी-उर्दू-पंजाबी मिश्रित नाटक, कावेरी इन्स्टिट्यूट ग्रुप प्रस्तुत ‘बालसंगीत महोत्सव’, केरळ महोत्सव, मराठी नाटके, जुळ्यांचे संमेलन, मराठी कविसंमेलन, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, मदनमोहन, ओ.पी. नय्यर, सलिल चौधरी, जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दीनिमित्त गायनातून अभिवादन, महिला नृत्य स्पर्धा, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिला मेकअप स्पर्धा, रोटरीचे ‘इंद्रधनु’,, संगीत सौभद्र आणि मराठी ऑर्केस्ट्रा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यामध्ये असेल.
गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता खास महिलांसाठी लावणी सादर होईल. नृत्यांगना अर्चना जावळेकर, पूजा सावंत, नमिता पाटील, संगीता लाखे, प्राची मुंबईकर, शुभांगी पुणेकर आदींचा सहभाग हे विशेष आकर्षण असेल. याचे संयोजन शशिकांत कोठावळे यांनी केले आहे. याच दिवशी रात्री ९.३० वाजता अभिनेत्री-नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित ‘ड्रीम गर्ल’ हा गाण्यांचा विशेष कार्यक्रम प्रख्यात गायिका गीतांजली जेधे व सहकारी सादर करतील.
शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता ‘इंद्रधनु’ हा युवा कलाकारांचा सामूहिक नृत्य, गायन, वादन कार्यक्रम सादर होईल. पाठोपाठ दुपारी १२.३० वाजता‘उगवते तारे’ हा लहान गटातील शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक नृत्य, गायन, वादनाचा कार्यक्रम सादर होईल. तसेच रात्री ९.३० वाजता हिंदी हास्यकविसंमेलनाचा कार्यक्रम सादर होईल. सदर कार्यक्रमाचे संजोजन दिलीप शर्मा यांनी केले असून, सुदीप भोला (दिल्ली), हिमांशू बवंडर (उज्जैन), सुमित्रा सरळ (रतलाम), द्वारका जालन (मंच संचालक, पुणे), बुद्धिप्रकाश दाधीच (कैकाडी, राजस्थान) हे नामवंत कवी त्यात सहभागी होत आहेत.
शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३०पासून महाविद्यालयीन विद्यार्थी व ओपन गट यांची ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा संपन्न होईल. अनुराधा भारती या कार्यक्रमाच्या समन्वयक आहेत. सायं. ५.३० वाजता भारती विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘आविष्कार भारती २०२५’ हा गायन, वादन व नृत्य यावर आधारित विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. सारंगधर साठे याचे समन्वयक आहेत. रात्री ९.३० वाजता हिंदी-उर्दू-पंजाबी मिश्रित ‘जिस लाहोर ने दैख्या, ओ जम्याई नई’ हे भावपूर्ण नाटक सादर होईल. याचे समन्वयक युवराज शहा आणि धनश्री हेबळीकर आहेत.
रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता कावेरी इन्स्टिट्यूट ग्रुपतर्फे‘बालसंगीत’ महोत्सव’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनावर आधारित विशेष कार्यक्रम सादर होईल. पल्लवी नाईक व अपर्णा लेले या समन्वयक आहेत. पुणे जिल्ह्यातील केरळवासीयांच्या ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे’ सायंकाळी ५.३० पासून ‘केरळ महोत्सव’ साजरा केला जाणार असून, केरळमधील विविध नृत्याविष्कार हे विशेष आकर्षण असेल. ‘पुणे मल्याळी फेडरेशन’चे अध्यक्ष राजन नायर हे याचे समन्वयक आहेत.
सोमवार, दि. १ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ हा एक सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा आविष्कार पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या आयुष्यातील खऱ्या प्रसंगावर आधारित नाटक सादर होईल. यातील प्रमुख भूमिका अभिनेत्री मुक्ता बर्वे सादर करतील.
मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ‘जुळ्यांचे संमेलन’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून, जुळी होण्याची वैद्यकीय कारणमीमांसा, जुळ्यांचे भविष्य भिन्न का?, जुळ्यांना वाढविताना येणारे पालकांचे अनुभव, जुळ्यांवरील चित्रपटांतील निवडक गाण्यांच्या चित्रफिती आणि केरळधील प्रामुख्याने जुळीच होतात त्या कोडिन्ही गावातील प्रमुखांचा सत्कार असा हा आगळावेगळा कार्यक्रम असणार आहे. याच दिवशी रात्री ९.३० वाजता ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हे संगीत–चित्र-नाट्य अभिवाचन सादर होईल. भक्ती आणि आत्मभावनेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या कार्यक्रमातील प्रमुख भूमिका प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सादर करतील.
बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता महिला व पुरुषांसाठी मेकअप स्पर्धा होणार असून, त्यामधील थीम ‘ब्रायडल व मायथॉलॉजिकल’ ही आहे. याच्या समन्वयक दीपाली पांढरे या आहेत. सायंकाळी ५.३० वाजता मराठी कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून, याचे सूत्रसंचालन प्रख्यात वात्रटीकाकार रामदास फुटाणे हे करतील. यामध्ये रामदास फुटाणे, महेश केळुसकर(फोंडा घाट), स्वप्नील चौधरी (जळगाव), प्रशांत मोरे (मालेगाव), मंदाकिनी पाटील (कल्याण), नितीन देशमुख (चांदूर बाजार), ममता सिंधूताई सपकाळ (पुणे), नारायण पुरी (नांदेड), अंजली कुलकर्णी (पुणे), आबा पाटील (मगसुळी), गुंजन पाटील (छत्रपती संभाजीनगर), नीलम माणगावे (जयसिंगपूर), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), अनिल दीक्षित (पिंपरी-चिंचवड) आदी महाराष्ट्रातील नामवंत कवी व कवयित्री सहभागी होणार आहेत. याच दिवशी रात्री ९.३० वाजता माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, मदनमोहन, ओ.पी. नय्यर, सलिल चौधरी, जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दीनिमित्त गायनातून अभिवादन करणारा ‘सोनेरी-चंदेरी सांगीतिक मैफल’ हा कार्यक्रम गायिका मनीषा निश्चल, संजीव मेहेंदळे व सहकारी सादर करतील.
गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘नृत्य झंकार’ ही विविध वयोगटांतील महिलांसाठी सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, संयोगिता कुदळे याच्या समन्वयक आहेत. सायंकाळी ५.३० वाजता शंतनू गोखले (संतूर) व हेमंत जोशी (तबला) यांची जुगलबंदी सादर होईल. यानंतर सायंकाळी ७.०० वाजता शैलेश भागवत (सनई) व पं. विनायक गुरव (तबला) यांची जुगलबंदी सादर होईल. रात्री ९.३० वाजता ‘रोटरी’ विश्वातील कलाकारांना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘रोटरीचे इंद्रधनु’ हा गायन, वादन व नृत्य यांवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होईल. याचे समन्वयक मोहन टिल्लू हे आहेत.
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ या स्पर्धेचे आयोजन केले असून, अॅड. अमृता जगधने या समन्वयक आहेत. सायंकाळी ५.०० वाजता ‘संगीत सौभद्र’ विशेष नाट्यप्रयोग स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान या संस्थेतर्फे सादर होईल. याचे समन्वयक सुचेता अवचट असून, निर्मितीप्रमुख चारुशीला केळकर आहेत. रात्री ९.३० वाजता अभिजात मराठी भाषेतील चित्रपट गीते, लावणी, अभंग व नाट्यगीते यांवर आधारित ‘सूर तेच छेडिता’ हा मराठी ऑर्केस्ट्रा गायिका श्रद्धा गायकवाड, हर्षित अभिराज, उमेश कुलकर्णी आणि सहकारी सादर करतील.
बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमांचे व्यवस्थाप्रमुख म्हणून श्रीकांत कांबळे व अतुल गोंजारी हे संयुक्तपणे काम पाहतील, असे मोहन टिल्लू यांनी शेवटी सांगितले.


