श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज (चित्रकुट, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते विद्युतरोषणाईचे उद््घाटन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक २७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


