३७ व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित “हास्य जत्रा” मराठी कवी संमेलन बुधवारी बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात रंगले. महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि कवयित्रींनी सादर केलेल्या व्यंगात्मक, राजकीय आणि सामाजिक वास्तव उलगडणाऱ्या कवितांनी रसिकांना खळखळून हसवले.
“माझ्या भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत रहा मोनालिसा”, “उपद्रव्य असेल तरच राजकारणात किंमत असते”, “एक खड्डा पुण्याचा, शंभर खड्डे मुंबईचे”, “बाप राबणारा तुझा माळरानावर, फुफुटा बाई फुफुटा” अशा राजकीय व्यंग्य कविता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
कवी प्रशांत मोरे, नितीन देशमुख, महेश केळुसकर, अनिल दीक्षित, आबा पाटील, स्वप्निल चौधरी, भरत दौंडकर, मंदाकिनी पाटील, अंजली कुलकर्णी, नीलम मांडगडे, वैशाली पतंगे आणि गुंजन पाटील या महाराष्ट्रातील कवींनी या संमेलनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी केले, प्रस्ताविक मोहन टिल्लू यांनी सादर केले.
आबा पाटील यांनी मोनालिसा कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. नितीन देशमुख यांनी काय शिकावे, शिकून काय शिकावे… मृगजळाचा भास शिकावा या गझलेतून शिक्षणातील विसंगती अधोरेखित केली. अनिल दीक्षित यांनी गल्लीत खड्डे, खड्ड्यातही खड्डे… या कवितेतून सरकारी यंत्रणेवर निशाणा साधला. महेश केळुसकर यांनी भेट तुझी माझी स्मृती आणि तडका भात गोची या विडंबन कवितांनी वातावरण रंगवले.
प्रशांत मोरे यांनी उभी आयात राबली या कवितेतून शेतकऱ्यांच्या संघर्षाला वाचा फोडली. वैशाली पतंगे यांनी परवा झालेल्या ब्रेकअप व तुझ्या अंगावर फेकलेले शेण या कवितांतून स्त्रियांच्या भावविश्वासह आधुनिक सावित्रीचे रूप उलगडले. गुंजन पाटील यांनी मला आई व्हायचं नाही या कवितेतून महिलांची व्यथा मांडली.
संमेलनात नितीन देशमुख यांनी बागेमध्ये आमच्या कशी नवलाई झाली या कवितेतून राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केले, तर मी पुन्हा येईन या कवितेतून निवडणुकीतील विसंगतींवर तिखट टोमणे मारले. या कवितांवर सभागृहात हशा आणि टाळ्यांचा गजर झाला.
या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते सहभागी कवी-कवयित्रींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला काका धर्मावत, श्रीकांत कांबळे आणि अतुल गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.


