Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedतब्बल १ लक्ष पोस्ट कार्ड पाठविणाऱ्या प्रा.सु.ह.जोशी यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित* ...

तब्बल १ लक्ष पोस्ट कार्ड पाठविणाऱ्या प्रा.सु.ह.जोशी यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित* पुणे सिटी पोस्ट, एकता मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने सन्मान पत्र लेखकाचा

 

 

पुणे : तब्बल १ लक्ष पोस्ट कार्ड, ६ हजार ५०० व्याख्याने, ४५० लेख आणि ५० पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा.सु.ह.जोशी या पत्र लेखकांचा आगळावेगळा सन्मान सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला. पुणे सिटी पोस्ट च्या ‘माय स्टॅम्प’ या संकल्पनेप्रमाणे प्रा.सु.ह.जोशी यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित करून त्यांच्या कार्याचा गौरव टपाल खात्याने केला.

 

एकता मित्र मंडळ सहकारनगर, पुणे सिटी पोस्ट आणि सहयोगी संस्थांच्या वतीने प्रा.सु.ह.जोशी यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन त्यांच्या नवी पेठेतील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पुणे सिटी पोस्टाचे सिनियर पोस्ट मास्तर विलास घुले, सुरेंद्र तापकीर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, कल्याणी सराफ, एकता मित्र मंडळाचे सुधीर ढमाले, शुभम बाणखेले, सुखकर्ता प्रतिष्ठानचे शेखर कोरडे यांसह प्रा.सु.ह.जोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 

विलास घुले म्हणाले, टेलिफोन, मोबाईल असलेल्या काळात देखील जोशी सरांनी पत्र लेखन करीत पोस्ट कार्ड पाठवून इतरांचे कौतुक करण्याची आवड जोपासली. पोस्ट ऑफिस हे माध्यम म्हणून निवडले, त्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. त्यांचे वेगळ्या पद्धतीने आभार मानण्यासाठी त्यांच्यावरील छायाचित्र तिकिट प्रदर्शित केले आहे. पुणेरी पगडी, उपरणे, चाफ्याची फुले, मिठाई देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

 

प्रा.सु.ह.जोशी म्हणाले, पत्र पाठविल्यानंतर वेगळ्या प्रकारे समाधान मिळत असे. पोस्ट खात्याने अनेक वेळा मला सहकार्य केले आहे. चांगल्या कामाचे कौतुक करणे थोडे असतात. त्यामुळे पोस्ट कार्ड पाठवून अशांचे कौतुक करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

 

आनंद सराफ म्हणाले, जोशी सरांनी मिळेल त्या वाहनाने, ट्रक बैलगाडीने सुद्धा हजारो किलोमीटरचा प्रवास स्वखर्चाने केला. सामाजिक जाणीवेने विना मानधन व्याख्याने दिली. प्रसिद्धीपरांगमुखता हा स्वभाव विशेष त्यांनी जपला आहे. देव, देश आणि धर्म या बद्दल त्यांना अपार निष्ठा आहे. आज वयाच्या ८६ व्या वर्षापर्यंत जोशी सरांनी १ लक्ष हून अधिक पोस्ट कार्ड पाठविली आहेत. सन १९५९ पासून त्यांनी हे काम सुरु केले. त्यावेळी अवघे ५ पैसे अशी कार्डची किंमत होती. दररोज किमान ७ ते ८ कार्ड ते इतरांना पाठवत असत. त्यांच्या या कार्याचा पोस्ट खात्याने आणि गणेशोत्सव मंडळाने केलेला सन्मान हा अवर्णनीय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments