अंकोलिका चक्रबर्ती आणि श्रीओश्री चक्रबर्ती या खेळाडूंना फाऊंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर
पुणे, दि. ११ सप्टेंबर, २०२५ : लहान वयापासूनच मुलांच्या आवडीनुसार योग्य दिशेने योग्य प्रयत्न करण्यात आले तर निश्चितच यशस्वी खेळाडू घडू शकतो असे म्हणतात, हेच लक्षात घेत पुण्यातील स्पोर्ट्सविस्टा फाऊंडेशनच्या वतीने वयवर्षे १० ते १६ या वयोगटातील गरजू आणि खेळात पुढे जाण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख टेबल टेनिस खेळाडूंना आवश्यक आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाबरस यांनी याविषयी पत्रकारांना माहिती दिली. स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजने अंतर्गत कलकत्त्या मधील अंकोलिका चक्रबर्ती व श्रीओश्री चक्रबर्ती या दोघींना ही शिष्यवृत्ती जाहीर झाल्याची घोषणा देखील बाबरस यांनी केली.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय टेबल टेनिस संघाच्या निवड समितीचे सदस्य असलेले अनिकेत कोपरकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असलेल्या सुजाता बाबरस हे देखील यावेळी उपस्थित होते.
वर नमूद केल्याप्रमाणे या योजनेच्या पहिल्या लाभार्थी असलेल्या अंकोलिका चक्रबर्ती या १५ वर्षे वयोगटाअंतर्गत मुलींमध्ये भारतात पहिल्या तर जगात सर्वोत्तम २० खेळाडूंपैकी एक आहेत. कलकत्यामधील नैहाती भागातून त्या येत असून त्यांची संपूर्ण जबाबदारी एकल पालक असलेल्या त्यांच्या आईवर आहे. वयवर्षे १५ अंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या ५ खेळाडूंमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या स्वप्नांना या शिष्यवृत्ती योजनेमुळे निश्चितच बळ मिळेल.
याबरोबरच श्रीओश्री चक्रबर्ती या वयवर्षे १३ पर्यंतच्या वयोगटात खेळणाऱ्या खेळाडू असून आज भारतात मुलींमध्ये त्या पहिल्या स्थानावर आहेत हे विशेष. सौम्यदीप रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्ता येथील डीडीएसपी अकादमीमध्ये त्या प्रशिक्षण घेत असून मध्यम सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून त्या येतात. श्रीओश्री यांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्याबरोबरच वयवर्षे १५ अंतर्गत मुलींच्या भारतीय संघात स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा फाऊंडेशनचा उद्देश आहे.
या शिष्यवृत्ती योजनेविषयी अधिक माहिती देताना सुनील बाबरस म्हणाले की, “कोणत्याही खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी ज्यापद्धतीने खेळाडूची इच्छा, योग्य वातावरण, प्रशिक्षित मार्गदर्शन यांची गरज असते तशी या सर्व गोष्टींचा आर्थिक भार उचलणे हे देखील महत्त्वाचे असते. हेच लक्षात घेत गरजू मात्र खेळात पुढे जाण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख खेळाडूंना काही आर्थिक मदत करता यावी या उद्देशाने पुण्यातील स्पोर्ट्सविस्टा फाऊंडेशनच्या माध्यमातून वयवर्षे १० ते १६ या वयोगटातील खेळाडूंना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही स्पोर्ट्सविस्टा मासिक शिष्यवृत्ती योजना सुरु केली असून याद्वारे पुढील २ ते ३ वर्षांत प्रतिवर्षी किमान ८ खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचा आमचा मानस आहे. याअंतर्गत आज पहिल्या दोन खेळाडूंच्या नावाची घोषणा आम्ही केली आहे. हे दोन्ही खेळाडू मध्यम आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीतून आले असून आर्थिक मदतीसोबतच त्यांना अनेकविध स्पर्धांमधील सहभागाविषयी मार्गदर्शन आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.” या योजनेअंतर्गत दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंतची मदत करण्याचा आमचा प्रयत्न असणार असून आवश्यकतेनुसार खेळाडूंना पुढील काही वर्षे ही मदत देण्याचा विचार संस्था करेल असेही बाबरस यांनी नमूद केले.
प्रामुख्याने १० ते १६ या वयोगटातील खेळाडूंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असून ज्या खेळाडूंना पालकांशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून आर्थिक मदत मिळत नाही अशांना आम्ही प्राधान्य देऊ. शिष्यवृत्ती योजनेमध्ये निवड होण्यासाठी सुरू किंवा आगामी हंगामात त्या खेळाडूने पहिल्या ८ खेळाडूंच्या यादीत असणे आवश्यक आहे. गुणवंत खेळाडूंसोबतच आर्थिक मदतीची गरज असणाऱ्या मध्यम आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीमधून येणाऱ्या खेळाडूंना देखील मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे अनिकेत कोपरकर यांनी स्पष्ट केले.
टीटीएफआय अर्थात टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने प्रत्येक राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेनंतर राष्ट्रीय रँकिंगची यादी प्रकाशित करण्यात येते याद्वारे प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यास आम्हाला मदत होईल असे सांगत सुजाता बाबरस म्हणाल्या की, याशिवाय अनिकेत कोपरकर हे राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असल्याने ते अनेक खेळाडूंना वर्षानुवर्षे जवळून पाहत आले आहेत याचाही फायदा आम्हाला होईल असा विश्वास आहे. शिवाय आम्ही सर्वच जण मागील तीन दशकांहून अधिक काळ या खेळाशी संबंधित असल्याने आम्ही देशभर प्रवास करत असतो. अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय सामने पाहत असतो, खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांशी देखील संवाद साधत असतो त्यामुळे गरजू आणि उदयोन्मुख खेळाडूंची निवड करण्यासाठी आम्हाला या गोष्टी उपयुक्त ठरतील.”
संस्था १० ते १६ वय वर्षे असलेल्या स्पर्धांतील पहिल्या ८ खेळाडूंकडून अर्ज मागविणार असून जर आम्ही त्यांच्या पर्यंत पोहोचू शकलो नाही तर खेळाडू देखील थेट या शिष्यवृत्तीसाठी अर्थ करू शकणार आहेत अशी माहिती सुजाता बाबरस यांनी दिली.


