पुणे : भारतीय पारंपरिक कला, लोककला आणि आधुनिक कलाप्रकारांचे जतन, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासोबतच कलाकारांना त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी, थेट विक्रीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘चित्र मंडई २०२६’ या राष्ट्रीय कला, संस्कृती स्वावलंबन उत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.
जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथील सामवेद कला, संगीत, दृश्यीकरण, मनोरंजन व अभिकल्प विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान पथ, जंगली महाराज रस्ता येथे हा उत्सव होणार आहे.
या उत्सवात चित्रकला, लोककला, पारंपरिक कला, शिल्पकला, कुंभारकला, हस्तकला तसेच आधुनिक व संगणकीय कलाप्रकारांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष कलानिर्मिती, कलाप्रात्यक्षिके, कलाकारांशी संवाद आणि कला व्यवसायविषयक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांची मेजवानी कलारसिकांना अनुभवता येणार आहे.
कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना बाजारपेठ मिळवून देणे, कलेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि कलाकारांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास प्रोत्साहन देणे, हा या उत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे चित्रकार, हस्तकलाकार, पारंपरिक कलावंत तसेच आधुनिक कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांसाठी हा उत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे आणि सामवेदचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. काटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
*नोंदणीची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत*
या उत्सवात सहभागी होण्यासाठी कलाकारांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी विनामूल्य असून, ३० ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. सहभागी कलाकारांना प्रदर्शनासाठी जागा, उपलब्धतेनुसार मेज व खुर्ची, पिण्याचे पाणी, चहा व अल्पोपाहार, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रचार-प्रसाराद्वारे प्रसिद्धी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहिती व नोंदणीसाठी ९७६६९ ३७९५६, ९९६०७ ३९४६७ या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येईल.


