भारताचे ‘सोलर मॅन’ व ‘सोलर गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात सौरऊर्जा शास्त्रज्ञ व हवामानाच्या क्षेत्रातील लढवय्ये प्राध्यापक चेतनसिंग सोलंकी यांनी एक क्वचितच आढळणारे व क्रांतीकारी पाऊल उचलत आयआयटी मुंबईतून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. प्राध्यापक सोलंकी यांनी हवामान बदलाच्या गंभीर संकटापासून मानवजातीला वाचवण्याचे काम पूर्ण समर्पणाने करण्यासाठी राजीनामा दिला आहे.
प्राध्यापक सोळंकी यांनी दोन दशकांहून अधिक काळ आयआयटी बॉम्बेमध्ये काम केले आहे, सौरऊर्जेबाबतचे शिक्षण व संशोधन या क्षेत्रात त्यांनी अग्रणी भूमिका बजावली आहे. सौरऊर्जेबाबत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, पेटंट्स प्राप्त केले आहेत, ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले आहेत आणि भारतातील सौरऊर्जेवरील सर्वांत मोठे संशोधन केंद्र स्थापन केले आहे.
मध्यप्रदेशातील छोट्याशा कुणालाही माहीत नसलेल्या गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोलंकी यांनी आयआयटी बॉम्बेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले, त्यांनी युरोपमध्ये सौरऊर्जेशी संबंधित विषयात पीएचडी संपादन केली आणि २००४ मध्ये ते स्वत:च्या देशात काम करण्यासाठी भारतात परत आले. कालांतराने ते सौरऊर्जेच्या विषयावर बोलणाऱ्या भारतातील प्रमुख व्यक्तींपैकी एक झाले.
२०२० मध्ये प्राध्यापक सोलंकी यांनी एका विशेष सोलर बसमधून एनर्जी स्वराज यात्रा सुरू केली. हवामान बदलाच्या गंभीर संकटाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि सामान्य नागरिक, शिक्षणसंस्था व सरकारी यंत्रणेला योग्य दिशेने कृती करण्यास प्रेरित करणे हे या यात्रेमागील उद्दिष्ट होते. डिसेंबर २०३० मध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. या प्रवासात त्यांनी ११ वर्षांपासून घरी न जाण्याची शपथ घेतली आहे आणि सोलर बसलाच आपले घर केले आहे. गेल्या पाच वर्षांत प्राध्यापक सोलंकी यांनी सोलर बसमध्ये राहून देशभरात ६८००० किलोमीटर प्रवास केला आहे आणि हवामान बदल या विषयावर १६५०हून अधिक व्याख्याने दिली आहेत. सामान्य माणसांची व संस्थांची हवामान बदलाप्रती निष्क्रियता या प्रवासादरम्यान त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ऊर्जा साक्षरता, इंदोर क्लायमेट मिशन आदी कार्यक्रम तयार केले.
मात्र, आता जागरूकता निर्माण करणे पुरेसे नाही अशा निष्कर्षाप्रत ते आले आहेत. त्यांच्या मते, आता कृती करण्याची गरज आहे. ते म्हणाले, “२ अंश सेल्सिअस ही जागतिक तापमानवाढीची मर्यादा आहे, त्या पलीकडे वाढ झाल्यास ती कमी करणे शक्य होणार नाही आणि २ अंश सेल्सिअसचा बदल केवळ २०-२५ वर्षांवर येऊन ठेपला आहे. जागतिक तापमान वाढीची मर्यादा आपण ओलांडली तर मानवी आयुष्याचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. आपले आयुष्य केवळ कठीणच नाही तर दिवसेंदिवस जगण्यासाठी महाग होत जाणार आहे.”
प्राध्यापक सोलंकी यांच्या मते, आपण ‘केले तर आत्ता, नाहीतर कधीच नाही’ अशा परिस्थितीत आहोत. आपण हवामानाच्या दृष्टीने आणीबाणीच्या स्थितीत आहोत आणि तरीही जग गाढ झोपलेले आहे.
यावर तोडगा म्हणून प्राध्यापक सोलंकी सर्वांना एक साधा प्रश्न विचारतात: “जेव्हा आपले उत्पन्न मर्यादित असते, तेव्हा आपले खर्चही मर्यादित असतात. त्याचप्रमाणे पृथ्वीचे आकारमान मर्यादित असेल, तर धार, मृदा ही तिची संसाधनेही मर्यादितच असतील. मग आपल्या इमारतींची, वाहनांची आणि कपड्यांची संख्या सातत्याने वाढवून कसे चालेल?” हवामान बदल रोखण्यासाठी आपण ‘मर्यादित पृथ्वी- मर्यादित उपभोग’ हा मंत्र आत्मसात केला पाहिजे. त्यांनी सुरू केलेल्या फायनाइट अर्थ मूव्हमेंटचेही हे मुलभूत घोषवाक्य आहे. प्राध्यापक सोलंकी यांचा फाटक्या मोज्याचा फोटो आणि ‘मला परवडते, पण निसर्गाला परवडत नाही’ अशा आशयाचे वाक्य हे या मुलभूत मंत्राचेच उदाहरण आहे.
आयआयटी मुंबईमधून राजीनामा दिल्याचे जाहीर करताना ते म्हणाले: “मी प्रतिष्ठेहून अधिक प्राधान्य हेतूला दिले. कारण आपण सध्या हवामानाच्या दृष्टीने आणीबाणीच्या काळात जगत आहोत, ही परिस्थिती पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वासाठी आव्हानात्मक झाली आहे.”
प्राध्यापक सोलंकी यांनी फायनाइट अर्थ मूव्हमेंट (एफईएम) सुरू केली. ही चळवळ एका सुलभ सत्यावर आधारित आहे, ते म्हणजे ‘मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोग शक्य नाही’. एईएमच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत एक अब्ज लोकांना हवामानासाठी करावयाच्या कृतीत सहभागी करून घेण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. “मी करिअरमध्ये बदल करण्यासाठी राजीनामा दिलेला नाही, तर हे कर्तव्यासाठी धावून जाणे आहे,” असे ते म्हणाले. “आयआयटी मुंबईने मला प्रतिष्ठा दिली पण एफईएम हे हेतूचे बीज आहे.”
२३ ऑक्टोबर २०२५ हा प्राध्यापक सोलंकी यांचा आयआयटी मुंबईतील कामाचा अखेरचा दिवस असेल. त्यांनी जगभरातील नागरिकांना, संस्थांना आणि सरकारांना ‘फायनाइट अर्थ मूव्हमेंट’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. केवळ राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय उद्दिष्ट म्हणून या चळवळीत सहभागी होण्याऐवजी हवामान बदलाकडे संपूर्ण मानवजातीपुढील समस्या म्हणून ब
घा असे आवाहन त्यांनी केले आहे.


