Sunday, August 30, 2026
Google search engine

 

 

पुणे : दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र मानलेल्या गिरनार क्षेत्रातील आद्य नाथपंथीय गुरु गोरखनाथ यांच्या मूर्तिभंजनाच्या घटनेचा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी विकृत मनवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या या लांछनीय प्रकारास जबाबदार असलेल्या समजकंटकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना तातडीने अटक करून जलदगतीने कायद्यानुसार सख्तपणे शिक्षा करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.

 

कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या रात्री गोरखनाथ शिखरावरील गुरु गोरखनाथ यांच्या मूर्तीची विटंबना करून शिरभंजन करण्यात येवून ती मूर्ती उचलून तेथील मंदिराच्या मागील बाजूस टाकण्याचे घृणास्पद व संतापजनक कृत्य करणाऱ्या गुंडगिरीच्या मानसिकतेचा ट्रस्टचे सर्व विश्वस्त अतिशय कठोर शब्दात निषेध करत आहेत. असंख्य दत्त सांप्रदायिक भाविकांच्या उग्रभावनांना या निषेधपत्राद्वारे व्यक्त करत आहोत.

 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे यांनी हा निषेध व्यक्त केला आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांना पाठवण्यात येणार आहे.

 

हिंदू धर्मातील सर्व समावेशक उपासना आणि सहिष्णूता या मूलभूत तत्वांना पायदळी तुडवण्याचा जो अश्लाघ्य प्रकार झाला आहे त्याची निर्भात्सन करण्यास शब्द अपुरे आहेत. हा अनिष्ठ आणि अनुचित अपराध करणाऱ्या व्यक्ती समाजामध्ये अशांतता निर्माण करून धार्मिक तेढ वाढवत आहेत. या दुःखद प्रसंगी सर्व दत्त भक्तांनी संयम बाळगून कोणताही अनुचित प्रकार घडू देवू नये असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात येत आहे. दत्त सांप्रदायिक भाविकांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपराधी व्यक्तींना तातडीने अटक करून कायद्यानुसार कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची आग्रही मागणी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त पुण्यातील सर्व दत्त भक्तांच्या वतीने करत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments