पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात पँथर्स, मुंबई लियॉन आर्मी, बंगाल विझार्ड्स संघांचा दुसरा विजय बंगाल विझार्ड्स संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी

तारां कित Avatar

पुणे, 14 डिसेंबर 2023: क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत गुजरात पँथर्स, मुंबई लियॉन आर्मी, बंगाल विझार्ड्स या संघांनी सलग दुसरा विजय मिळवला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी गुजरात पँथर्स संघाने पंजाब पेट्रीएटस संघाचा 43-37 असा पराभव केला. महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीन व गुजरातच्या एकतेरीना याशिना यांच्यातील लढत 10-10 अशी बरोबरीत सुटली. गुजरातच्या सुमित नागल याने पंजाबचा दिग्विजय प्रताप सिंगचा 13-7 असा पराभव करून आघाडी घेतली. मिश्र दुहेरीत एकतेरीना याशिना व मुकुंद ससीकुमार यांना पंजाबचा कोनी पेरीन व अर्जून कढे यांनी 9-11 असे पराभुत केले.. पुरूष दुहेरीत गुजरातच्या सुमित नागल व मुकुंद ससी कुमार यांनी पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंग व अर्जून कढे यांचा 11-9 असा पराभव विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात मुंबई लियॉन आर्मी संघाने हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाचा 41-39 असा विजय मिळवला. या सामन्यावेळी हैद्राबाद स्ट्रायकर्सची सह मालक रकुल प्रीत सिंगने यावेळी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती लावली होती. सामन्यात महिला एकेरीत मुंबईच्या सौजन्या बावीशेट्टीला हैद्राबादच्या एलेन परेझचा 11-9 असा पराभुत केले. पुरूष एकेरीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबीसने हैद्राबादच्या निकी पोनाचाचा 11-9 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत मुंबईच्या सौजन्याने विजय सुंदर प्रशांतच्या साथीत हैद्राबादच्या एलेन परेझ व साकेत मायनेनी यांना 10-10 असे बरोबरीत रोखले. अखेरच्या पुरूष दुहेरीत अर्नेस्ट गुलबिस व विजय सुंदर प्रशांत यांनी हैद्राबादच्या साकेत मायनेनी व निकी पोनाचा यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

तिसऱ्या सामन्यात बंगाल विझार्ड्स संघाने पुणे जॅगवॉर्स संघाचा 47-33असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. महिला एकेरीत पुण्याच्या डायना मर्सिनचेविकाला बंगालच्या मारिया तीमोफिवाने 7-13 असे पराभुत केले. पुरुष एकेरीत पुण्याच्या लुकास रोसोलने बंगालच्या श्रीराम बालाजीचा 11-9 असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. मिश्र दुहेरीत मारिया तीमोफिवा व अनिरुध्द चंद्रशेखर यांनी पुण्याच्या डायना मर्सिनचेविका व रित्वीक बोलीपल्ली यांचा 14-6 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीत श्रीराम बालाजी व अनिरुध्द चंद्रशेखर यांनी पुण्याच्या रित्वीक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांचा 11-9 असा पराभव करून विजय मिळवला.

चौथ्या लढतीत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाचा 44-36 असा पराभव केला. विजयी संघाकडून अरिना रोडीनोवा, रामकुमार रामनाथन, विष्णू वर्धन यांनी सुरेख कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिला.

गुण तक्त्यात तिसऱ्या दिवस अखेर बंगाल विझार्ड्स संघ 129 गुणांसह अव्वल स्थानी असून बेंगळुरू एसजी माव्हरिक्स 127 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Tagged in :

तारां कित Avatar