Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेडिओ मिरची घेऊन येत आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे कमाल किस्से; सुबोध भावे यांच्या...

रेडिओ मिरची घेऊन येत आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे कमाल किस्से; सुबोध भावे यांच्या आवाजात रेडिओवर रंगणार ‘असा घडला महाराष्ट्र’!

पुणे, १२ ऑगस्ट २०२६:
बऱ्याचदा आपल्याला आपल्या परंपरेची, संस्कृतीची आणि वास्तुंची फक्त नावं माहीत असतात; पण त्यामागे दडलेलं अद्भूत खगोलशास्त्र, इतिहास आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मात्र माहीत नसतो! निसर्गावर मात करून बांधलेले रस्ते असोत, १३०० वर्षांपूर्वी उभारलेली मंदिरे असोत, समुद्राची छाती फाडून उभारलेले जलदुर्ग असोत, किंवा एकाच अर्कातून दोन वेगळ्या चवी जन्माला घालणारी आपली खाद्यसंस्कृती असोत, महाराष्ट्र म्हणजे केवळ जुन्या गोष्टींचा संग्रह नसून स्वाभिमान, अथांग लोककला, अवलिया माणसं आणि जगात भारी इंजिनिअरिंगचा मिलाप आहे!
महाराष्ट्र म्हणजे फक्त नकाशावर आखलेली एक सीमा किंवा काही शहरांचा समूह नाही, तर महाराष्ट्र म्हणजे एक जिवंत भावना आहे! आपण रोज ज्या ऐतिहासिक वास्तूंच्या कुशीत राहतो किंवा ज्या अस्सल संस्कृतीचा आस्वाद घेतो, त्यामागे आपल्या पूर्वजांची जिद्द आणि अद्भूत इतिहास दडलेला आहे. महाराष्ट्राची हीच समृद्ध परंपरा, स्वाभिमान आणि जगाच्या दोन पावले पुढे विचार करणारी वृत्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी टीम रेडिओ मिरची घेऊन येत आहे एक खास नवा कोरा रेडिओ शो ‘असा घडला महाराष्ट्र’.
या भव्य कार्यक्रमाचे सारथ्य महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सुबोध भावे करत असून, २४ ऑगस्ट २०२६ पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि प्रगत विचारशैलीच्या वारशाचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात पुन्हा जागा करणे, हा या रेडिओ शोचा ध्यास आहे.
नुकतीच ‘असा घडला महाराष्ट्र’ कार्यक्रमाची पत्रकार परिषद संपन्न झाली, यावेळी अभिनेते सुबोध भावे म्हणाले,
“रेडिओ मिरची… अतिशय प्रसिद्ध रेडिओ चॅनेल, आणि अनेक वर्ष त्यांच्याबरोबर माझ्या सिनेमाच्या निमित्ताने गप्पा होत आहेत, पण आता रेडिओ मिरची वर मी गप्पा मारणार आहे माझ्या प्रेक्षकांबरोबर.
आणि विषय सुद्धा आपला आवडीचा… तो म्हणजे महाराष्ट्राचा! कारण महाराष्ट्राविषयी आपल्या सगळ्यांना अभिमान आहे.
पण हा महाराष्ट्र घडला कसा? त्याच्या पाठीमागे किती लोकांचे परिश्रम होते, किती संस्थांचं त्याच्यात योगदान होतं, त्या संस्था कशा उभ्या राहिल्या, त्या संस्था घडवण्यामध्ये कोणा कोणाचा वाटा होता… हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे रेडिओ मिरची वरून!
आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो आणि त्याची उत्तरं आपल्याकडे नसतात. कारण आपल्या कोणीतरी, आजीनं, आईनं सांगितलेलं असतं, की, “बाळा! शनिवारी केस कापायचे नाहीत हा! पण का? अशा अनेक ऐकलेल्या गोष्टीं विषयीचं लॉजिकही तुम्हाला या कार्यक्रमातनं ऐकायला मिळणार आहे.
मला स्वतःला खूप आनंद होतोय आणि मी खूप उत्सुक आहे की कधी एकदा हा कार्यक्रम तुमच्यासमोर रेडिओ मिरची बरोबर मी घेऊन येतोय…लवकरच!”
हा शो म्हणजे कोणतीही रटाळ किंवा कंटाळवाणी इतिहासाची तासिका नसून सुबोध भावे यांच्या ओघवत्या आणि ‘महाराष्ट्रीयन-कूल’ शैलीत सादर केलेली एक रंजक आणि अभिमानास्पद सफर असणार आहे.
प्रसारणाची वेळ आणि शहरे:
‘असा घडला महाराष्ट्र’ हा शो पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला आणि अमरावती या ७ शहरांमध्ये रेडिओ मिरचीवर प्रसारित केला जाईल.
प्रसारणाची वेळ: सोमवार ते शुक्रवार, संध्याकाळी ६ ते ८.
पुन:प्रसारण: शनिवार व रविवार (वेगळ्या वेळेत)
आपल्या महाराष्ट्राची खरी श्रीमंती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी टीम रेडिओ मिरची पूर्णपणे सज्ज झाली आहे.
येत्या २४ ऑगस्ट २०२६ पासून ‘असा घडला महाराष्ट्र’ हा श्रोत्यांच्या भेटीस येतोय,
अधिक माहिती व संपर्कासाठी:
नाव: स्मिता रणदिवे
संस्था: रेडिओ मिरची
ईमेल: smita.ranadive@timesgroup.com
मोबाईल क्रमांक: 9822316822

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments