पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे आणि कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे’ यांच्यात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे.
या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रकल्प, इंटर्नशिप तसेच भविष्यातील नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या करारामुळे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच दोन्ही संस्थांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार आहेत.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रसंगी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रा. डॉ. विरेंद्र शेटे (संचालक – एनईपी, रँकिंग व मान्यता), कुलसचिव डॉ. महेश चोपडे, आणि परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. ज्ञानदेव निलवर्ण उपस्थित होते.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून कुलगुरू प्रा. डॉ. एस. बी. भिरूड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे आणि प्रा. डॉ. विभा व्यास (विभागप्रमुख – इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग) यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला.
या कराराचा उद्देश शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच ज्ञानविनिमयाच्या माध्यमातून दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमधील सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विविध शाखांतील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संसाधन वाटप आणि दोन्ही संस्थांच्या समन्वयातून संशोधनास चालना मिळून विद्यार्थी व संशोधकांना आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये अधिक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.