Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedऐसी अक्षरे विशेषांक हे माडगूळकर बंधुंच्या साहित्यिक कर्तृत्वाला केलेले अभिवादन ज्येष्ठ...

ऐसी अक्षरे विशेषांक हे माडगूळकर बंधुंच्या साहित्यिक कर्तृत्वाला केलेले अभिवादन ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन बेलवलकर सांस्कृतिक मंचातर्फे ‘ऐसी अक्षरे’चा माडगूळकर विशेषांक प्रकाशित माडगूळकर बंधूंच्या प्रवासावर आधारित ‘दोन पाती-एक बंध’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचेही आयोजन

 

पुणे, दि. १७ ऑक्टोबर, २०२५ : माडगूळकर बंधुंचे साहित्यिक कर्तृत्व अधोरेखित करणारा ‘ऐसी अक्षरे’चा विशेषांक म्हणजे केवळ स्मरणरंजन नाही, तर मराठी वाचकांची वाङ्मयीन दृष्टी जाणती करण्याचे, मराठी वाचकांच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करण्याचे जे कार्य दोन्ही माडगूळकर बंधुंनी केले, त्या कर्तृत्वाला केलेले हे अभिवादन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.

 

पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ‘ऐसी अक्षरे’च्या माडगूळकर बंधूंच्या साहित्यावरील विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. अरुणा ढेरे, लोकप्रिय गीतकार, कवी गुरू ठाकूर, बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर, ऐसी अक्षरे मासिकाचे संपादक पद्मनाथ हिंगे, राधा बेलवलकर आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्ताने ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या माडगूळकर बंधूंच्या साहित्यिक प्रवासावर आधारित ‘दोन पाती-एक बंध’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

मयूर कॉलनीमधील बालशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. दृकश्राव्य संहितेचे लेखन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी आणि जयश्री बोकील यांचे होते. प्रसिद्ध निवेदक राजेश दामले यांनी कार्यक्रम सादर केला.

 

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, “ऐसी अक्षरे’च्या या विशेषांकातून गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर या दोघांच्याही लेखकपणापलीकडचे काही पैलू वाचकांसमोर येतात. दोघांचे बालपण, संस्कार, भोवताल, त्यांचा काळ आणि त्यांचे अनुभवविश्व, या साऱ्यांचे दोघांनीही आपल्या स्वतंत्र प्रतिभेने सोने केले आणि सर्वार्थाने मराठी मातीचे, मराठी साहित्याचे ऋण फेडले. आपले जीवनानुभव त्यांनी ज्या पातळीवर नेऊन रसिकांसमोर ठेवले, त्याला तोड नाही. गदिमांची गीतसृष्टी हे मराठी भावगीत परंपरेचे वैभव आहे. तर व्यंकटेशांचे लेखन हे अस्सल, जोमदार ग्रामीण जीवनाचे वास्तव आहे. चित्रमयता हे दोघांच्याही लेखनाचे वैशिष्ट्य आहे. या अंकाच्या निमित्ताने समग्र माडगूळकर पुन्हा पुन्हा वाचावेत, ही ओढ वाचकांना लागेल, असे सामर्थ्य या अंकात आहे.”

 

गुरू ठाकूर म्हणाले, “मला माडगूळकर बंधू प्रथम दिवाळी अंकातून भेटले आणि आज माडगूळकरांवरील दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे, त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना मनात आहे. माझ्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला माडगूळकर भेटत गेले आहेत. त्यांच्या लेखनातल्या चित्रमयतेचे बोट धरण्याचा मी प्रयत्न केला. व्यक्तिरेखा, त्यांचे वर्णन, भाषा, आशय प्रत्येक टप्प्यावर दोन्ही माडगूळकरांचे कर्तृत्व सतत जाणवते.” मला माडगूळकर असे भेटत राहिले नसते, तर आज मी जिथे आहे, तिथे नसतो, असेही गुरू ठाकूर म्हणाले. ज्या मातीत जन्मलो, तिथे रुजा, तिथे फुलून आल्यावर इतर विचार करा, हे तत्त्व मला तात्यांच्या लेखनातून उमगले. ऐसी अक्षरेच्या प्रत्येक अंकाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे, ते अशा साहित्यामुळेच, असेही त्यांनी सांगितले.

 

बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर म्हणाले, “ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर हे माडगूळकर बंधू मराठी साहित्यातील प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वे आहेत. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच त्यांच्याबद्दल नव्या पिढीला देखील माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही ‘दोन पाती-एक बंध’ या विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. विशेषतः दोघांमधील बंधुत्वाचे सूत्र, हा ऐसी अक्षरे च्य विशेषांकाचा गाभा आहे. मराठी साहित्यातील दोन बंधूंचे एकाच क्षेत्रातील प्रचंड कर्तृत्व, हे दुर्मिळ आहे. तसेच साहित्यापलीकडचे त्यांचे काही पैलू वाचकांना परिचित व्हावेत, असाही उद्देश आहे. सिद्धी कुलकर्णी यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments