लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा रविवारपासून (१७ डिसेंबर) कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राच्या सामुदायिक पठणाने होणार उत्सवाला प्रारंभ

तारां कित Avatar

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रम दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.

उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण दत्तभक्त करणार आहेत. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प.पू. नाना महाराज तराणेकर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे रविवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. तर, अध्यक्षस्थानी अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोरचे प.पू. बाबा महाराज तराणेकर असणार आहेत.

रविवारी सायंकाळी ५ वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. याशिवाय प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचा मानपत्र व आचार्य पगडी देऊन विशेष गौरव केला जाईल. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ.पराग काळकर यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवारी, सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत तर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी पं. गजानन वाईकर लिखित गुरुचरित्र प्रकाशन श्री दत्त कलामंच येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल. यावेळी वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त डॉ.शरद जोशी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त कलामंच येथे विद्यार्थी अर्थसहाय्य प्रदान कार्यक्रम होणार आहे. यावेळी गरजू विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देण्यात येणार असून धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, डी.वाय.पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत लघुरुद्र होणार असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने व संगीता रासने हे यजमान असणार आहेत. यावेळी १०१ महिला पारंपरिक वेशात रुद्रपठण करणार आहेत, तर केशव शंखनाद पथकातर्फे शंखनाद देखील होईल. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त कलामंच येथे गुरुदत्त दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडेल. यावेळी ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार व माजी उपमहापौर दीपक मानकर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवांतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts