Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedतरूण मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी : तज्ञ

तरूण मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी : तज्ञ

पुणे,11 नोव्हेंबर 2025 : किशोरवयीन आणि तरूण व्यक्तींमध्ये टाईप 2 मधुमेहाचे वाढते प्रमाण पाहता त्याच्याशी निगडीत गुंतागुंत देखील आयुष्यात खूप आधी उद्भवू शकतात. साखरेचे प्रमाण नीट व्यवस्थापित केले नाहीत,तर त्याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो.त्यामुळेच तरूण मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

 

मधुमेहाबाबत आता समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली असली तरी याचा डोळ्यांवर होणारा परिणाम यांबाबत अनेक लोकांना पुरेशी माहिती नसते.14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने डायबेटिक रेटिनोपॅथी या तुलनेने दुर्लक्षित गुंतागुंतीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.भारतातील प्रौढ व्यक्तींमध्ये अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे.

 

पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथील रेटिना तज्ञ डॉ.रश्मी काशिकर म्हणाल्या की,आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या अर्ध्याहून जास्त मधुमेहींना त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो हे माहित नसते,म्हणूनच अधिक जागरूकता आणि कृतीची आवश्यकता आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की,टाईप 1 मधुमेहींना निदान झाल्यानंतर 5 वर्षात दृष्टीपटलाची तपासणी करणे आवश्यक आहे,तर टाईप 2 मधुमेहींनी निदान झाल्यावरच नेत्र तपासणी करून घ्यावी. विशेष करून ज्यांना मूत्रपिंड संबंधी किंवा इतर गुंतागुंत आहेत,जी लोकं डायलिसिसवर आहेत,त्यांनी नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दृष्टीपटलाची तपासणी करून घ्यावी.जेव्हा साखरेचे प्रमाण हे सातत्याने जास्त असते तेव्हा डोळ्यामागच्या व प्रकाशाबाबत संवेदनशील असलेल्या दृष्टीपटलातील छोट्या रक्तवाहिन्यांना हानी पोहचू शकते. या स्थितीला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात.दृष्टीपटलातील रक्तवाहिन्यांना हानी पोहचल्याने कालांतराने दृष्टी धूसर होणे,डोळ्यात रक्तस्त्राव,डोळ्यासमोर काळे ठिपके दिसणे (फ्लोटर्स) किंवा उपचार न केल्यास अंधत्वही येऊ शकते. लवकर निदान व वेळेवर उपचार महत्त्वाचे असते,मात्र अनेक लोकांना या स्थितीबाबत माहिती नसल्याने ही स्थिती पुढील टप्प्यात पोहचेपर्यंत उपचारासाठी येत नाही.

 

डॉ.काशीकर पुढे म्हणाल्या की,तरूण भारतीय लोकसंख्येमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना,प्रत्येक तरूण मधुमेहींनी वर्षातून एकदा तरी दृष्टीपटलाची तपासणी (कॉम्प्रेहेंसिव्ह डायलेटेड आय एक्झाम) करून घ्यावी.तरूण मधुमेहींमध्ये जास्त काळ रक्तातील साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याने (हायपरग्लायसेमिया) डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता आणि त्याच्याशी निगडीत गुंतागुंतींची शक्यता देखील वाढते.

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार 25 वर्षे वयाखाली निदान झालेले टाईप 1 व टाईप 2 मधुमेहींना तरूण मधुमेही समजले जाते.

 

याबाबतीत जागरूकतेचा अभाव लक्षात घेता व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने आम्ही विशेष करून वस्त्यांमध्ये निदान चाचण्या करीत आलेलो आहोत.सध्या पीसीएमसी व चाकण परिसरातील वस्त्यांमध्ये डोळ्यांच्या तपासणीसाठी आमच्या मोबाईल व्हॅन्स कार्यरत आहेत व दररोज 30 ते 40 जणांची नेत्र तपासणी केली जाते ही माहिती एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.कुलदीप डोळे यांनी

दिली.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments