Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोयंबतूर इथे संस्कृतभारतीचे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन 

कोयंबतूर इथे संस्कृतभारतीचे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन 

 

 

कोयंबतूर (तामिळनाडू), नोव्हेंबर – तामिळनाडूमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेले संस्कृतभारतीचे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झाले. या संमेलनास देशातील ४३ प्रांतांमधून २४७२ प्रतिनिधी उपस्थित राहिले, तर इंडोनेशिया व दुबई येथील कार्यकर्त्यांनीही येथे सहभाग नोंदविला.

 

संस्कृतभारतीच्या या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते झाले. “आपण सर्वांनी संस्कृतमधून संभाषण केले पाहिजे,”असे विचार त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मंचावर श्रीलश्रीकामाक्षीदासस्वामीजी, अमृतानंदमयी विद्यापीठाचे श्री. तपस्यामृतनंदपुरी स्वामीजी, संस्कृतभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गोपबंधू मिश्र, महामंत्री सत्यनारायण भट्ट हे उपस्थित होते. “संस्कृत कुटुंब” या संकल्पनेवर संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेश सोनी यांनी मार्गदर्शन केले. संस्कृत भाषेत संवाद करणाऱ्या संस्कृत कुटुंबांचे एकत्रीकरण व अनुभवकथन, तसेच भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावर आधारित प्रदर्शनी हे संमेलनाचे आकर्षण केंद्र होते.

 

माता अमृतानंदमयी विद्यापीठाच्या भव्य परिसरात संपन्न झालेल्या या अधिवेशनाचा प्रमुख विषय “भारतीय ज्ञानपरंपरा” होता. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिवेशनातील सर्व संवाद, सत्रे, कार्यक्रम, क्रीडा आणि सांस्कृतिक सादरीकरणे संस्कृतमधूनच पार पडली. केंद्र शासनाच्या उच्च शिक्षा मंत्रालयातील भारतीय ज्ञानपरंपरा विभागाचे संचालक प्रा. गंटी सूर्यनारायण मूर्ती यांनी संस्कृत भाषेतून भारतीय ज्ञानपरंपरेचे सुलभ विवेचन केले. पारंपरिक संस्कृत महापंडित आचार्य देवदत्त पाटील (गोवा) यांनी आपल्या प्रबोधनातून पारंपरिक व आधुनिक विचारांचा संगम साधला. आय.आय.टी. हैदराबाद येथे संस्कृत क्रेडिट कोर्स सुरू केल्याबद्दल संस्कृत, तसेच आधुनिक शास्त्रांमधील तज्ज्ञ प्रा. बी.एस. मूर्ती यांचा विशेष गौरव या प्रसंगी करण्यात आला.

 

भारतीय ज्ञानपरंपरेचे प्रत्यक्षात आचरण करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. त्यात चेन्नईचे संस्कृत महापंडित मणिद्रविड शास्त्री, केरळचे पारंपरिक वैद्य सेतुमाधवन, लोखंडापासून दर्पणाची काच निर्माण करणारे सेल्वराज, भारतीय पाकशास्त्रानुसार भोजन निर्माण करणारे बालाजी पट्टप्पा, कांचीपुरमचे प्रसिद्ध वस्त्रनिर्माता लोकनाथ, सुप्रसिद्ध स्थापत्यकार वीळ्ळीनाथाचार्य, अभिनेत्री शांतीश्री, अभिनेता वीरमंगल, राजीवन पण्णिकर इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.

 

अधिवेशनात संस्कृतभारतीच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी प्रा. रमेशकुमार पांडेय (हरियाणा) यांची बिनविरोध निवड झाली. संस्कृत भाषेतून नित्य व्यवहार, संस्कृत भाषेचा स्वाध्याय आणि अध्यापन इत्यादी संकल्प यावेळी कार्यकर्त्यांद्वारे घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments