‘
पुणे, २६ ऑगस्ट २०२६: नाविन्य (इनोव्हेशन), तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांतील प्रेरणादायी प्रवासाचा वेध घेणारे, सुश्री तारा डोड्डीहाल यांनी लिहिलेले ‘अरुण फिरोदिया – मिस्टर आर अँड डी, द वे अहेड…’ (Arun Firodia – Mr. R&D, The Way Ahead…) हे पुस्तक बुधवारी, २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात प्रसिद्ध करण्यात आले. हे पुस्तक प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे (BARC) माजी संचालक डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशित झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे तज्ज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते; ते ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’चे (CSIR) माजी महासंचालक आणि ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’चे (NCL) माजी संचालक आहेत.
हा कार्यक्रम पुणे येथील सेनापती बापट रोडवरील ‘एमसीसीआयए’ (MCCIA) ट्रेड टॉवर ‘ए’ येथे आयोजित करण्यात आला होता.
‘अरुण फिरोदिया, मिस्टर आर अँड डी: द वे अहेड’ हे पुस्तक पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांचे जीवन, त्यांचे विचार आणि नाविन्यपूर्ण प्रवासाचा आढावा विविध कथा व अनुभवांच्या माध्यमातून घेते. हे पुस्तक गतिशीलता (मोबिलिटी), शाश्वतता, ग्रामीण विकास आणि उद्योजकता या क्षेत्रांतील त्यांचे कार्य व दृष्टिकोन मांडते. तसेच, कुतूहल, प्रयोगशीलता आणि ‘का नाही?’ (why not) अशी सकारात्मक वृत्ती कशा प्रकारे अर्थपूर्ण नाविन्यपूर्ण बदलांना जन्म देऊ शकते, यावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
मर्यादांमध्येही संधी शोधणे आणि तंत्रज्ञान व उद्योजकतेला एका व्यापक सामाजिक उद्देशाशी जोडणे, यासाठी तरुण संशोधक, विद्यार्थी, उद्योजक आणि भावी नेत्यांना प्रेरित करण्याचा उद्देश या पुस्तकाचा आहे.
‘कायनेटिक ग्रुप’चे अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अरुण फिरोदिया हे भारतातील सर्वसामान्यांपर्यंत परवडणारी गतिशीलता (मोबिलिटी) पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. आयआयटी (IIT) बॉम्बे आणि एमआयटी (MIT), अमेरिका येथील माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. फिरोदिया यांनी भारतातील अत्यंत यशस्वी अशा स्वदेशी मोबिलिटी उत्पादनांपैकी एक असलेल्या ‘लूना’च्या (Luna) निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, भारतीय दुचाकी उद्योगातील तांत्रिक नवोपक्रमांमध्येही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
या पुस्तकाच्या लेखिका सुश्री तारा डोड्डीहाल यांच्याकडे धोरण (स्ट्रॅटेजी) आणि संवाद (कम्युनिकेशन्स) या क्षेत्रांतील तीन दशकांहून अधिक काळाचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्यांनी विविध क्षेत्रांतील वरिष्ठ नेतृत्वाशी जवळून काम केले असून, व्यावसायिक धोरणाला प्रभावी संवादाशी जोडण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.


