राज्यात एकीकडे नगरपालिका आणि नगर परिषदांचे बिगुल वाजले असतानाच नवी मुंबईतील अग्रगण्य,जवळपास 1350 सदस्य असलेल्या सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस चांगलाच रंग भरला. आता , आज ,शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी या निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले असून ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर, निवडणुकीत कुणी बाजी मारली, ते स्पष्ट होईल. सर्व मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली असल्याने प्रथम दर्शनी
लोकसभा/ विधानसभा निवडणुकीसारखे
वातावरण निर्माण झाले आहे,जणू काही
उमेदवार ,त्यांचे कार्यकर्ते आणि सर्व मतदार हे दाखवून देत आहे की, “हम भी कुछ कम नही!”
सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अनुकरण
सर्वच जेष्ठ नागरिक संघांनी केल्यास ,सर्वच ठिकाणी कार्यक्षमता, पारदर्शकता वाढून ते सर्व जेष्ठ नागरिक संघ, त्यांचे सदस्य आणि एकूणच समाजाच्या भल्याचा दृष्टीने योग्य राहील असे वाटते.
“पूर्व पिठीका ”
नवी मुंबईतील पहिलाच जेष्ठ नागरिक संघ, असा मान असलेला
सानपाडा जेष्ठ नागरिक संघ जवळपास
20 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आला आहे. विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करणे, त्यांची चर्चा करणे, झालेल्या कार्यक्रमाविषयी बोलणे, विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होणे गुणवंतांचा सत्कार करणे, असे सर्व काही
या संघात सुरू असते. पण गेले काही आठवडे संघाच्या निवडणुकीशिवाय दुसरा काही विषयच निघेनासे झाले आहे.
सतत सक्रिय असलेल्या या संघाच्या कार्यक्रमांना, उपक्रमांना विविध प्रसार माध्यमांनी गेल्या एकदोन वर्षांमध्ये चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे कधी नव्हे ते संघाच्या कामासाठी 32 सदस्य सरसावले आणि त्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुकीमुळे आपापसात कटुता निर्माण होऊन वातावरण कलुषित होते, संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, या बाबी विचारात घेऊन सर्व मान्य तोडगा काढण्यासाठी विद्यमान
कार्यकारिणीने संघाचे आश्रयदाते तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष
सामोपचार बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीपर्यंत चार उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 28 उमेदवार राहिले. पण सामोपचार बैठकीत माघार कुणी घ्यायची? यावर एकमत झाले नाही. त्यामुळे निवडणूक
बिनविरोध होणार नाही, असे लक्षात आल्याने सर्व उमेदवारांनी स्वतः चा प्रचार
करताना, इतरांची बदनामी होणार नाही, संघाचे नाव खराब होणार नाही, असे आवाहन श्री देवेंद्र भुजबळ यांनी करून त्या बैठकीचा समारोप केला.
प्रथेप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी; म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात
निवडणुकीला तोंड फुटलेच.
वातावरण इतके तापले की, एका सदस्याने विद्यमान कार्यकारिणीतील कुणीच उमेदवार नको, सर्व पदाधिकारी
नवीनच हवेत, अशी जोरदार मागणी एका सदस्याने केली. उपस्थित दोन अडीचशे सदस्यांनी मोठ्या जल्लोषात ही मागणी उचलून धरली. शेवटी सभेचा रागरंग बघून विद्यमान अध्यक्ष मारुती कदम यांनी ही मागणी मान्य केल्याचे
जाहीर केले. ही मागणी मान्य
झाल्याने उमेदवार म्हणून उभे असलेले, विद्यमान कार्यकारिणीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सहसचिव असे एकूण आठ उमेदवार कमी झाले. दरम्यान चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले.
अशा प्रकारे आता अकरा जागांसाठी एकावडे जगदीश नारायण,कदम राजेंद्र गेनबापू ,खरात भरत बाबूराव, गोळे लक्ष्मण बाबुराव, घोलप शंकर राजाराम ,देसाई जगन्नाथ पांडुरंग, नागपुरे देवदत्त सोमेश्वर, नांदवडेकर बाबुराव आत्माराम , पाटील महादेव बंडू , पाटील शुभांगी सदाशिव , बोराडे सीमा शंकर ,
मानधने मंगलाबाई गोवर्धनजी, लांडगे राजदत्त आत्माराम ,विश्वासराव मारुती किसन , शिंदे नाना महादेव आणि शेजाळे अमोल भगवान असे सोळा उमेदवार निवडणूक लढवत असून, प्रत्येक जण र आपापल्या परीने हिरीरीने प्रचार करीत होता.काहीनी स्वतःचे जाहीरनामे प्रसिद्ध केले, वेगवेगळी वचने, आश्वासने दिली. कुणी सकाळच्या हास्य क्लब मध्ये येऊन, मी निवडणुकीला उभा असून निवडून आल्यावर काय काय करेल, हे सांगत होता . तर काही जण चक्क समाज माध्यमाद्वारे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते.
अशा या सर्व निवडणूकीच्या रण धुमाळीत सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या नवीन संघात कोणते अकरा खेळाडू
निवडल्या जातील, हे आजच्या मतदानानंतर होणार्या मतमोजणी नंतरच कळेल!
_ देवेंद्र भुजबळ
9869484800.


