पुणे: डॉ. आनंद बर्वे अनुवादित ‘योगतत्त्वोपनिषद’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. एरंडवणे सेंट्रल जवळील कै. गुळवणी महाराज पथ येथील सेवा भवन येथे पुस्तक प्रकाशन समारंभ होणार आहे. प.प. विद्या नृसिंह भारती करवीर पीठ कोल्हापूरचे श्री जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे.
यावेळी मूत्र शल्य तज्ञ सुरेश पाटणकर, पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित राहणार आहेत.
डॉ. आनंद बर्वे म्हणाले, शरीर आणि मन एकत्रपणे आरोग्यसंपन्न, सुदृढ असणे हे योगशास्त्रामुळे होऊ शकते. शारीरिक आणि मानसिक याबरोबरच स्वास्थ्याच्या अध्यात्मिक पैलूचाही योगशास्त्र विचार करते. बऱ्याच अभ्यासाकांशी बोलताना योगशास्त्रातले संस्कृतमधील मूळ ग्रंथ अभ्यासायला मिळावेत अशी त्यांची तळमळ दिसून आली. जिज्ञासू अभ्यासकांसाठी हे ग्रंथ मराठीत आणता येतील का ? त्यातील विषय समजावा या दृष्टीने काही भाष्य लिहिता येईल का ? अशा विचारातून केवळ एक सुरुवात म्हणून ‘योगतत्त्वोपनिषद्’ या छोटेखानी उपनिषदाचा मराठी अनुवाद करण्याचे व त्यावर भाष्य लिहिण्याचे ठरविले. यातूनच योगतत्वोपनिषद पुस्तकाची निर्मिती झाली.