पुणे, दि. १२ डिसेंबर, २०२५ : उस्ताद शुजात खाँ यांच्या सतारीवर झंकारलेला तिलककामोद आणि जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांचे मंत्रमुग्ध करणारे अभिजात गायन हे सवाईच्या तिसऱ्या सत्राच्या उत्तरार्धाचे वैशिष्ट्य ठरले.
आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या उत्तरार्धात प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शुजात खाँ यांच्या सतारीचे झंकार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. त्यांनी सतारीवर राग तिलककामोद छेडला. रागरूप दर्शवणारी आलापचारी करून इमदादखानी घराण्याची वैशिष्ट्ये जपत, त्यांचे वादन उत्तरोत्तर रंगत गेले. आलाप, जोड, झाला या क्रमाने रागाची बढत करत, रागवाचक सूर नेमकेपणाने दर्शवत त्यांनी रागाचे नादचित्र उभे केले. मुकेश जाधव आणि अमित चोबे यांच्या तबला साथीने हे वादन अधिकाधिक लालित्यपूर्ण होत गेले. अद्धा त्रितालातील गतवादनाने वातावरण भारले गेले आणि अनुभवी, प्रगल्भ वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
शुजात खाँ यांच्या मैफिलीत नेहमीच वादनासह गायनही ऐकायला मिळते. त्यानुसार ‘जिंदगी से बड़ी कोई सजा ही नहीं…’ ही गझल, तसेच ‘ओ पालन हारे…’, ‘छाप तिलक सब छीनी रे, मोसे नैना मिलईके…’ या रचना वादनासह गायनातून देखील त्यांनी सादर केल्या. गायन, सुरेलता आणि भाव विभोर करणारे स्वर यामुळे श्रोत्यांशी भिडण्याची त्यांची ताकद जाणवली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांनी राग ‘जोग’ने सुरवात केली. अतिशय शांतपणे रागाची बढत करत त्यांनी अभिजात गायकीचा प्रत्यय दिला. विलंबित झपतालात ‘ प्रथम मन अल्लाह जीन सब रचो है…’ ही पारंपरिक बंदिश प्रस्तुत करताना, ही बंदिश गुरू पं. रत्नाकर पै यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याला जोडून ‘तान देरेना तारे दानी…’ हा तराणा त्यांनी सादर केला. राग बागेश्रीमध्ये ‘मनमोहन शाम…’ ही रचना आणि ‘सुनत तान भयी मै बावरिया…’ ही द्रुत बंदिश त्यांनी रंगवली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘चला हो परदेसिया…’ ही भैरवी सादर करत तिसऱ्या सत्राची सुरेल सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच ऋतुजा लाड आणि निषाद कैकाडी यांनी (तानपुरा व स्वरसाथ) केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
प्रसिद्ध लेखक, संपादक आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त मुकुंद संगोराम लिखित ‘स्वरायन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास जोशी, लेखक मुकुंद संगोराम, डॉ अश्विनी भिडे- देशपांडे, भरत कामत, सुयोग कुंडलकर यावेळी उपस्थित
होते.


