Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedडबल व्हायोलिन वादनातून रसिकांना मिळाला अनोखा श्रवणानंद मारव्याच्या सुरांनाही रसिकांची मिळाली...

डबल व्हायोलिन वादनातून रसिकांना मिळाला अनोखा श्रवणानंद मारव्याच्या सुरांनाही रसिकांची मिळाली दाद व्यंकटेशकुमार यांच्या प्रगल्भ गायनाने दिला स्वरस्मरणीय अनुभव

पुणे, दि. १४ डिसेंबर, २०२५ : सवाईचे पाचवे सत्र मारवा रागाच्या सुरांनी सांगतेची हुरहुर जागवणारे ठरले आणि डबल व्हायोलिनवादनाच्या आगळ्यावेगळ्या नादानुभवाने वेगळा श्रवणानंद देणारे होते.

 

सवाईच्या पाचव्या सत्राच्या उत्तरार्धात प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांनी राग मारवा सादर केला. विलंबित एकतालातील ‘गुरुनाम का सुमिरन करिए…’ या रचनेतून तसेच ‘सप्तसूरन मे परमेश्वररूप…’ या मध्यलय त्रितालातील बंदिशीतून सावनी यांनी रागरूप स्पष्ट केले. सायंकालीन वातावरणाशी जवळीक साधणाऱ्या मारवा रागाचे स्वरभावरूप त्यांनी गायनातून उभे केले. अतिशय शांत पण आर्त अशा स्वराकृती, तसेच बंदिशीच्या आशयाला सुसंगत असे त्यांचे गायन रसिकांच्या पसंतीची दाद मिळवून गेले. त्यानंतर पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांची ‘हो गुनियन मिल गावो बजावो…’ बंदिश एकतालात सादर करत, मिश्र मारुबिहाग रागातील डॉ. संजीव शेंडे रचित ‘मतवाले बलमा…’ हा दादरा पेश करून वेगळी वातावरण निर्मिती केली. ‘राम गावा राम घ्यावा…’ या समर्थ रामदासांच्या अभंगाने त्यांनी गायन संपवले. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), राहुल गोळे (हार्मोनिअम) यांनी पूरक साथसंगत केली. प्रीती पंढरपूरकर जोशी व श्रृती वैद्य यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

 

सवाईच्या पाचव्या सत्रातील वाद्यवादनाचे एकमेव सादरीकरण ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. शंकर यांनी सादर केले. दोन नेकचे डबल व्हायोलिन वादन असल्याने या वादनाविषयी रसिकांनाही उत्सुकता होती. “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणे, हा आनंदाचा भाग आहे. हा भारतातील सर्वात मोठा संगीत महोत्सव आहे आणि यामध्ये सहभागी होण्याची संधी, माझ्यासाठी सन्मानजनक आहे”, अशा शब्दांत डॉ. एल. शंकर यांनी सुरवातीला आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य संगीतातील हरीकांबोजी राग सादर केला, ज्याचे हिंदुस्थानी संगीतातील राग झिंझोटीशी साम्य आहे. रागम्, तालम्, पल्लवी या क्रमाने त्यांनी सादरीकरण केले. सव्वानऊ मात्रांमध्ये केलेले हे वादन झाल्यावर त्यांनी राग गौरीमनोहारी मधील रचना पेश करून विराम घेतला. एल. शंकर यांना अमित कवठेकर यांनी पूरक तबलासाथ केली.

 

यानंतर ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेशकुमार यांच्या प्रगल्भ आणि दमदार गायनाने एक स्वरस्मरणीय अनुभव रसिकांना दिला. विलंबित एकतालातील ‘फूलन की हरवा…’ या रचनेतून आणि ‘गजरे बनकर आई…’ या द्रुत त्रितालातील बंदिशीतून पं. व्यंकटेशकुमार यांनी स्वरमंडप जणु पूरियामय केला. त्यानंतर त्यांनी राग केदार मधील ‘झनकार परी…’ ही तिलवाडा मधील रचना, तसेच ‘कान्हा रे नंदनंदन…’ ही त्रितालातील बंदिश, रामदासी मल्हार रागातील ‘बादरवा गहर आये…’ ही त्रितालातील रचना, रसिकांच्या आग्रहाखातर तीन भक्तिरचना पं. व्यंकटेशकुमार यांनी ऐकवल्या. अतिशय निर्मळ, स्वच्छ आणि सुस्पष्ट सूर, लयतालांची अप्रतिम क्रीडा आणि वेधक स्वराकृतींचे नक्षीकाम, यांनी नटलेले हे गायन दीर्घकाळ रसिकांच्या मनात राहील, असे रंगले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी गायनाची रंगत खुलवणारी साथसंगत केली. शिवराज पाटील व नागनाथ नागेश यांनी तानपुऱ्यावर साथ केली. आनंद देशमुख यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments