Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिवासींची कला ही निसर्गातून लाभलेल्या लयीतून निर्माण झालेली कलानिर्मिती : पी. मणी...

आदिवासींची कला ही निसर्गातून लाभलेल्या लयीतून निर्माण झालेली कलानिर्मिती : पी. मणी सुंबा आर्ट फेस्ट २०२५चे उद्घाटन

पुणे, १६ डिसेंबर २०२५ :

 

आदिवासींची कला ही निसर्गातून लाभलेल्या लयीतून निर्माण झालेली कलानिर्मिती आहे. आदिवासी समाजातील सृजनशीलतेला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे गौरवोद्गार तामिळनाडूतील नीलगिरी येथील आदिवासी संघाचे अध्यक्ष पी. मणी यांनी सुंबा आर्ट फेस्ट २०२५च्या उद्घाटनप्रसंगी काढले.

 

सुंबरान आर्ट फाऊंडेशनतर्फे सुंबा आर्ट फेस्ट २०२५ हा महोत्सव १५ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हा कला महोत्सव ज्येष्ठ चित्रकार कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे.

 

उद्घाटन सोहळ्याला तामिळनाडूतील नीलगिरी येथील आदिवासी संघाचे अध्यक्ष पी. मणी, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, प्रसिद्ध उद्योजक व कलारसिक विनय फडणीस, चैत्रा क्रिएशन्सच्या संस्थापिका व उद्योजिका तसेच कै. प्रा. गुरव यांच्या कन्या चित्रा मेटे, आदिवासी जीवन, संस्कृती व कलाविष्काराचे अभ्यासक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे व त्यांच्या पत्नी पूर्वा परांजपे हे मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुंबा आर्ट फेस्ट २०२५ मध्ये सहभागी झालेल्या आसाम, मेघालय, तामिळनाडू, ओडिशा आणि महाराष्ट्रातील आदिवासी कलावंतांना कै. प्रा. रावसाहेब गुरव यांनी काढलेले चित्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. गौरी दामले यांनी केले.

 

चित्रा मेटे यांनी सांगितले की, सुंबा आर्ट फेस्टच्या निमित्ताने आठ राज्यांतील दहा आदिवासी जमाती त्यांच्या पारंपरिक वेशभूषेसह दहा वेगवेगळ्या कला प्रकारांसह पुण्यात सहभागी होत आहेत. भारतात सुमारे ८०० लोककला असून त्यापैकी तीन-चार कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या लोककलांचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वाचे कार्यही सुंबा आर्ट फेस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.

 

देशभरातील आदिवासी जीवन व संस्कृतीची छायाचित्रे संकलित करणारे श्रीकृष्ण परांजपे म्हणाले की, आदिवासी कला हा आपला मौल्यवान वारसा असून तो जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सरकारी पातळीवर आदिवासी समाजातील तरुण पिढीला प्रशिक्षण, त्यांच्या कलेची प्रसिद्धी व विपणनाचे मार्गदर्शन दिले पाहिजे. तसेच मूळ आदिवासी कलेच्या बनावट नक्कल केलेल्या वस्तूंची विक्री थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

पूर्वा परांजपे यांनी सांगितले की, आदिवासी संस्कृती व कलांमधील पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य टिकवण्यासाठी त्यांच्या कलात्मक वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

 

विनय फडणीस म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी संस्कृती व कला उजळून निघणार आहेत. कला व संस्कृतीची समृद्ध परंपरा असलेल्या पुण्यातील रसिकांना या महोत्सवातून ही अनुभूती घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

 

या महोत्सवात सुंबा बाजार, सुंबा सभा, सुंबा सन्मान असे विविध उपक्रम होणार आहेत. तसेच प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव आणि ज्येष्ठ कलावंत पद्मश्री वासुदेव कामत यांच्या विशेष सादरीकरणासह त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महोत्सवापूर्वी, कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या शिल्पाचे अनावरण १३ डिसेंबर रोजी त्यांच्या ‘सुंबरान’ स्टुडिओमध्ये करण्यात आले. कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या कन्या चित्रा गुरव मेटे यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त या कला सप्ताहा

चे आयोजन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments