पुणे, –
तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर जाणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य यासाठी व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. थोरात म्हणाले की, प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही तरी काँग्रेस ही लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे.
थोरात यांनी सांगितले की, काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी, पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.
अजित दरेकर
वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
फोटो ओळ – डावीकडून अजित दरेकर , बाळासाहेब थोरात आणि मोहन जोशी
——————————————————————————————————————————-
प्रेस नोट
कार्यक्रमाचे नाव : माध्यमकर्मी व समाजमाध्यम (चर्चासत्र)
ठिकाण : मराठी कला अकादमी, पणजी, गोवा
दिनांक : 11 जानेवारी २०२६
वेळ : सायंकाळी ५.०० ते ७.००
मराठी कला अकादमी, पणजी येथे आज माध्यमकर्मी व समाजमाध्यम या विषयावर सखोल व परखड चर्चासत्र पार पडले. पत्रकारिता, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि लोकशाही यांमधील नातेसंबंधांवर या चर्चासत्रात स्पष्ट मतप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर म्हणाले की, गोव्यातील पत्रकारिता ही स्वाभिमान जपणारी आहे. गोवा लहान राज्य असले तरी येथील समस्या मोठ्या आहेत. भाषा कोकणी असली तरी अभंग परंपरा, संस्कृती मराठी आहे. तरीही मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागते. गोव्यातील राजकीय अस्थिरता, पक्षांतर, भू–कन्व्हर्जन, प्रदूषणकारी उद्योग आणि दिल्लीतील लोकांकडे जाणारी जमीन याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
इन गोवाचे प्रतिनिधी प्रभाकर ढगे म्हणाले की, प्रसारमाध्यम खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिला आहे का, हा प्रश्न आहे. गोवा लहान असल्यामुळे पत्रकारांना ओळखीमुळे आणि धमक्यांमुळे काम करणे कठीण होते. छापले तेच खरे, अशी लोकांची मानसिकता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना सागर जावडेकर यांनी सांगितले की, आजची पत्रकारिता आणि पूर्वीची पत्रकारिता यात मोठा फरक आहे. सोशल मीडियामुळे कोणाच्याही प्रतिमेचे खच्चीकरण सहज होते. चांगल्या लिखाणापेक्षा टीका जास्त होते. विधानसभेत पत्रकारांविरोधात झालेल्या टिप्पणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या वेळी किरण ठाकूर यांनीच ठामपणे समर्थन केले.
डिजिटल व सोशल मीडिया सरकारचे हस्तक बनले आहेत का? या प्रश्नावर उत्तर देताना बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे म्हणाले की, पत्रकारिता ही एंटी-एस्टॅब्लिशमेंट असली पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे ही पत्रकारितेची खरी बांधिलकी आहे. “News is what someone somewhere is trying to suppress, बाकी सर्व जाहिरात आहे,” असे ते म्हणाले. माध्यमांची भूमिका पहारेकरी म्हणून असावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माध्यमांसमोरील आव्हानांवर बोलताना जावडेकर म्हणाले की, डिजिटल बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवता येत नाही. सरकारविरोधी नव्हे, तर सरकारातील भ्रष्टाचाराविरोधात लिहिणे गरजेचे आहे. प्रिंट मीडियावर अधिक जबाबदारी आहे, कारण सोशल मीडियासारखी अविश्वसनीयता प्रिंटमध्ये चालत नाही.
मेन्स्ट्रीम मीडियातील शोध पत्रकारितेबाबत बोलताना अभिजीत कांबळे म्हणाले की, आज मीडिया कॉर्पोरेट झाला असून टीआरपी आणि बाइट संस्कृती वाढली आहे. ग्राउंड रिपोर्टिंग कमी झाली आहे. पत्रकारितेपेक्षा रील्स, फॉलोअर्स आणि चमकोगिरी वाढत चालली आहे, ही चिंताजनक बाब आहे.
या चर्चासत्रातून माध्यमांची भूमिका, जबाबदारी आणि भविष्यातील दिशा या
वर गंभीर आत्मपरीक्षण घडले.


