इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या शाश्‍वत परिसंस्थेसाठी सुट्या भागांची स्थानिक पातळीवर निर्मिती आवश्यक – विविध तज्ञांचे मत

तारां कित Avatar

पुणे,16 डिसेंबर 2023 : इलेक्ट्रिक व्हेईकल्स उद्योगात परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी आणि शाश्‍वत परिसंस्था स्थापित करण्यासाठी सुट्या भागांची स्थानिक पातळीवर निर्मिती आवश्यक असल्याचे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.डेक्क्न कॉलेज येथे आयोजित सीआयआय नेक्सजेन एक्स्पो या दोन दिवसीय प्रदर्शन व परिषदेतील ईव्ही विषयक चर्चासत्रात विविध तज्ञांनी आपले मत मांडले,.

याप्रसंगी आयोजित परिसंवादात सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल,इलेक्ट्रिक व्हेईकल्स टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या प्रॉडक्ट लाईन विभागाचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि एचव्ही प्रोग्रॅमचे प्रमुख आनंद कुलकर्णी, ग्रीव्हज कॉटन लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरुप बसू, कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी , आरएसबी ट्रान्समिशन्स (आय) लि. चे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा, न्यू मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठ, ब्रुगइकनेक्ट एजी, स्वित्झर्लंड चे कंट्री मॅनेजर दीपल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.झी बिझनेसच्या कार्यकारी संपादक स्वाती खंडेलवाल यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.

सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले,तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण योग्य मार्गावर आहोत,मात्र अजून जलद गतीने पुढे जाण्यासाठी वाव आहे. सर्व सुट्या भागांची निर्मिती देशात होणे गरजेचे आहे.पुढील काळात या सुट्या भागांची निर्यात भारतीय उद्योगात आणखी महत्त्व प्राप्त करेल.

कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या,ईव्ही उद्योगाच्या बाबतीत आपण चांगली सुरूवात केली असून सरकारने एक चांगला धोरण आराखडा मांडला आहे.फेम 1 आणि फेम 2 मुळे मागणी निर्माण करण्यात यश मिळाले आहे.हा उद्योग कंपन्यांना व्यवहार्य होण्यासाठी ईव्हीचा वाटा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.धोरणाच्या पुढच्या टप्प्यात सरकारने प्रोत्साहन सुरू ठेवत फेम 3 साठी उद्योगांनी सरकारकडे विनंती केली आहे.त्यामुळे ईव्ही वाहने परवडणार्‍या किमतीत उपलब्ध होऊ शकतील.

न्यू मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठ म्हणाले की,उर्जा आपण कुठून आणत आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे.ओईएम कंपन्या आणि इतर भागधारकांनी एकत्र येऊन सुट्या भागांच्या स्थानिक निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत.

ग्रीव्हज कॉटन लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरूप बासू म्हणाले की,हा उद्योग चांगला प्रस्थापित होण्यासाठी परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे.पुढील 3 ते 4 वर्षात लक्षणीय बदल अपेक्षित आहेत.

इलेक्ट्रिक व्हेईकल्स टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या प्रॉडक्ट लाईन विभागाचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि एचव्ही प्रोग्रॅमचे प्रमुख आनंद कुलकर्णी म्हणाले की,आपल्या येथे मोठ्या प्रमाणावर नाविन्यपूर्ण कल्पना पुढे येत आहेत आणि यामुळे पुढील काळात खर्च कमी होतील.

ब्रुगइकनेक्ट एजीचे कंट्री मॅनेजर दीपल शहा म्हणाले की,चार्जिंग स्टेशनच्या आकडेवारीकडे लक्ष देण्यापेक्षा उच्च पातळीची सुरक्षितता, विश्‍वासार्हता आणि प्रत्येकाला उपलब्ध होईल हे उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.फास्ट डीसी चार्जिंग सुविधेमुळे आपण हे आकडे कमी करू शकतो.भारत हा ईव्ही संदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये जागतिक आघाडी घेऊ शकतो.

आरएसबी ट्रान्समिशन्स (आय) लि. चे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा म्हणाले की, कुठल्याही ईव्ही वाहनाच्या बाबतीत मालकी खर्च हा महत्त्वाचा असतो.हे कमी करण्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Tagged in :

तारां कित Avatar