Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान हा जिवंत संवाद माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी....

संविधान हा जिवंत संवाद माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात प्रतिपादन

 

पुणे: संविधान हे तयार उत्तरांचे पुस्तक नाही, तर मतभेद, अनुभव आणि संवादातून घडणारी जिवंत प्रक्रिया आहे,” असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश जस्टिस डी . वाय चंद्रचूड यांनी केले.

 

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (ADYPU) स्कूल ऑफ लॉ अँड लिबरल आर्ट्सतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, कुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, स्कूल ऑफ लॉ अँड लिबरल आर्ट्सचे अधिष्ठाता डॉ. सनी थॉमस, सहाय्यक प्राध्यापक केदार कुलकर्णी तसेच एडीवायपीयूचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

जस्टिस डी . वाय चंद्रचूड म्हणाले, कायद्याने शिकवलेली महत्त्वाची सवय म्हणजे अनिश्चिततेसोबत जगणे आणि त्यात सहज राहणे. मतभेद हे लोकशाहीचे दुर्बलत्व नसून सामर्थ्य आहे. संविधान मतभेद संपवण्यासाठी नाही, तर त्यांच्यासोबत जगण्याची चौकट देण्यासाठी आहे.

निर्णयातील नम्रता, भाषेची शिस्त आणि मानवी अनुभवांची व्यापकता यावर भाष्य करताना चंद्रचूड म्हणाले, प्रत्येक वाक्याचे परिणाम असतात, प्रत्येक विरामाला अर्थ असतो. काळानुसार मौनही बोलते.

पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की भाषणे कायद्याला न्यायालयाबाहेर येण्याची संधी देतात. निर्णय वाद मिटवतात, तर भाषणे विचारमंथन आणि संवादाला वाव देतात.संविधान हे भूतकाळ व वर्तमान, संस्था व नागरिक, सत्ता व सद्सद्विवेक यांमधील जिवंत संवाद आहे.कायद्यातील मौनांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की अनेक निर्णायक घटनांची सुरुवात दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांकडे कान देण्याने होते.

भारतातील सामाजिक सुधारणांची परंपरा अधोरेखित करत त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची आठवण करून दिली. समता आणि प्रतिष्ठेच्या संकल्पना संविधानात लिहिल्या जाण्यापूर्वीच संघर्षातून घडल्या होत्या, असे ते म्हणाले.

अपूर्ण राहिलेल्या घटनात्मक प्रश्नांवर बोलताना त्यांनी वैवाहिक बलात्कार अजूनही गुन्हा म्हणून मान्य नसल्याकडे लक्ष वेधले. “समाज बदलण्याची वेळ आली नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संविधान परिपूर्णतेचे आश्वासन देत नाही, पण भिन्न विचार असलेले लोकही एका सामायिक राजकीय प्रवासात सहभागी होऊ शकतील अशी प्रक्रिया देते. “लोकशाही मतभेदांमुळे कोसळत नाही; मतभेद दडपले गेले की ती कोसळते,” असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसोबतसंवादात्मक चर्चेने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments