Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे ग्रँड टूर’मध्ये चिमुकल्यांचाही जल्लोष; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंना पाहून बालक–पालक आनंदले*

पुणे ग्रँड टूर’मध्ये चिमुकल्यांचाही जल्लोष; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंना पाहून बालक–पालक आनंदले*

 

 

पुणे, दि. २० : पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेने अवघ्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर जगभरातील नामवंत सायकलपटू सुसाट वेगाने निघाले असतांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेल्या चिमुकल्यांचा आणि पालकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

 

लांबूनही खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली लहान मुले या स्पर्धेचे आजचे मोठे आकर्षण होते. अनुश्री, ओजस्वी आणि प्रिशा ठोंबरे यांनी आपल्याला सायकल चालवायला खूप आवडत असल्याचे सांगत सायकल स्पर्धा बघण्याचा आनंद व्यक्त केला. आर्या नावाची छोटी मुलगी तर चक्क आपली चारचाकी सायकल घेऊन स्पर्धा पाहण्यासाठी आली होती. मितांश या मुलाने भविष्यात आपणही मोठ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बोलून दाखवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

 

या आनंदात केवळ मुलेच नव्हे, तर पालकही सहभागी झाले होते. स्पार्कलेट सोसायटीचे रहिवासी हर्षल ठोंबरे हे आपल्या मित्रमंडळी आणि मुलांसह स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. “अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा पुण्यात होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आमच्या मुलांना खेळाची आवड लागेल आणि पुढील पिढी घडेल. शासनाने आणि आयोजकांनी असे उपक्रम वारंवार राबवावेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

याच ठिकाणी स्वप्ना इंगळे या आपल्या मुलगी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केया इंगळे हिच्यासह स्पर्धेचा आनंद घेताना दिसल्या. परदेशी सायकलपटूंना इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धास्थळी केवळ टाळ्यांचा कडकडाटच नव्हता, तर देशभक्तीच्या घोषणांनीही वातावरण भारावून गेले होते. ‘भारत माता की जय’, ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय शिवाजी’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या उत्साही वातावरणातून केवळ खेळालाच प्रोत्साहन मिळाले नाही, तर भावी पिढीमध्ये सायकलिंगची नवी उमेद आणि स्वप्ने रुजत असल्याचे चिमुकल्यांच्या डोळ्यांतील चमक पाहून सहज जाणवत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments