Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआरएआयच्या वतीने ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६) चे आयोजन

एआरएआयच्या वतीने ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६) चे आयोजन

येत्या २७ ते ३० जानेवारी दरम्यान पुण्यात होणार वाहनउद्योग क्षेत्रासंबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद

 

पुणे, दि. २१ जानेवारी, २०२६: केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असलेल्या व देशातील वाहनउद्योगाची प्रमाणन, संशोधन व विकास संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने येत्या मंगळवार दि. २७ जानेवारी ते शुक्रवार दि. ३० जानेवारी, २०२६ दरम्यान ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६)चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा एआरएआयचे संचालक आणि एसआयएटी २०२६ चे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

 

एआरएआयच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही प्रमुख द्विवार्षिक परिषद असून सदर वर्ष हे परिषदेची १९ वी आवृत्ती असेल. मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे सदर परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ. मथाई यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेसाठी यावेळी एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके, एआरएआयचे उपसंचालक व एसआयएटी एक्स्पो २०२६ चे समन्वयक एम. आर. पाठक आणि एआरएआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

एसआयएटी २०२६ चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होईल, तर समारोप समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांची उपस्थिती असणार आहे. सदर परिषदेसाठी ऑनलाइन पद्धतीने पूर्व-नोंदणी करता येणे शक्य असून यावर्षीच्या परिषदेला मोठ्या प्रमाणात उद्योग व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थी सहभागी होतील असा विश्वास देखील आयोजकांच्या वतीने डॉ. मथाई यांनी व्यक्त केला.

 

१९८५ मध्ये सुरू झालेल्या एसआयएटीने आजवर आपल्या १८ आवृत्त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून वाहनउद्योग क्षेत्रातील संशोधन, नवोपक्रम आणि धोरणात्मक संवादांसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचांपैकी एक मंच म्हणून आज एसआयएटीची ओळख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, एसआयएटीमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांबरोबरच अनेक केंद्रीय मंत्री, नामांकित नवसंशोधक आणि अनेकविध मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती राहिली असून हेच या परिषदेचे वेगळेपण अधोरेखित करते.

 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एसआयएटीला सातत्याने पाठिंबा दिला असून या परिषदेदरम्यान संपन्न होणाऱ्या सर्व प्रमुख सत्रे, चर्चासत्रे व तांत्रिक चर्चांमध्ये झालेल्या विचारमंथनातून उपस्थितांना कायमच महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते. या माहितीचा उपयोग भारताच्या वाहनउद्योग क्षेत्रातील धोरण निर्मिती आणि धोरणात्मक दिशानिर्देशांमध्ये देखील होत असतो हे विशेष.

 

यावेळी पुढे बोलताना डॉ. रेजी मथाई म्हणाले, “एसआयएटी २०२६ हे जागतिक वाहन उद्योगाशी संबंधित भागधारकांसाठी एक सहयोगी व्यासपीठ म्हणून आयोजित केले जात असून ‘इनोव्हेटिव्ह पाथवेज फॉर सेफ अँड सस्टेनेबल मोबिलिटी’ अर्थात ‘सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी नाविन्यपूर्ण मार्ग’ ही यावर्षीच्या एसआयएटी २०२६ आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना आहे. याद्वारे मोबिलिटी अर्थात गतिशीलतेमध्ये प्रगत सुरक्षितता, शाश्वतता आणि तांत्रिक नवोपक्रमासाठी उद्योगाची सामूहिक जबाबदारी यांचे प्रतिबिंब आपल्याला दिसून येईल. ‘एसआयएटी २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद एआरएआयच्या हीरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असून साठ वर्षांहून अधिक काळ वाहन उद्योग क्षेत्रातील मानकांना चालना देणे, नाविन्याला सक्षम करणे आणि विश्वास वाढवणे याच्या जोरावर एआरएआय हे भारताच्या मोबिलिटी अर्थात गतिशीलता या परिसंस्थेचा कणा राहिले आहे असे सांगत डॉ. मथाई पुढे म्हणाले की, “गेल्या काही वर्षांमध्ये, एसआयएटी एक प्रतिष्ठित जागतिक मंच म्हणून विकसित झाले असून धोरण निर्मिती आणि तांत्रिक प्रगतीमध्ये देखील एसआयएटीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यावर्षी संपन्न होणारी ही परिषदेची १९ वी आवृत्ती हा वारसा निश्चितच पुढे चालू ठेवेल असा आम्हाला विश्वास आहे.”

 

आपल्या वर्षभर चालणाऱ्या हीरक महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून, एआरएआयने अनेक उपक्रमांची योजना आखली असून यामध्ये प्रगत प्रयोगशाळा व केंद्रांचे उद्घाटन, स्पर्धा व हॅकॅथॉनद्वारे युवा पिढीचा सहभाग वाढविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन, इनोव्हेटर्स, शास्त्रज्ञ आणि उद्योगपतींद्वारे घेण्यात येणारी चर्चात्मक सत्रे यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. मथाई यांनी दिली.

 

‘एसआयएटी २०२६’ विषयी अधिक माहिती देताना डॉ. एन. एच. वाळके म्हणाले, “आतापर्यंत एसआयएटी २०२६ साठी आम्हाला प्रामुख्याने संशोधक आणि अभियांत्रिकी समुदायाकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून या परिषदेत ६०० हून अधिक शोधनिबंधांचा सहभाग असेल. उदयोन्मुख व भविष्यातील वाहनउद्योग तंत्रज्ञानावर देखील या परिषदेत सखोल तांत्रिक चर्चा होईल तर परिषदेवेळी होणाऱ्या परिसंवादात ३,००० हून अधिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञ सहभागी होतील. याबरोबरच परिषदेच्या तीन दिवसांत होणाऱ्या ६४ तांत्रिक व तीन प्लीनरी सत्रांमध्ये या क्षेत्राशी निगडीत महत्त्वाची सादरीकरणे आणि त्यांवरील चर्चा संपन्न होतील. प्रदर्शनात जगभरातील अग्रगण्य वाहनउद्योग कंपन्यांचे तंत्रज्ञानसुद्धा प्रदर्शित केले जाणार असल्याने ते पाहण्याची संधी उपस्थितांना मिळेल.”

 

एसआयएटी दरम्यान संपन्न होणाऱ्या प्रदर्शनाविषयी माहिती देताना एम. आर. पाठक म्हणाले की, “एसआयएटी एक्स्पो २०२६ हे वाहनउद्योग क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसाठी त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सेवा इतरांपुढे प्रदर्शित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ असून यामुळे अर्थपूर्ण औद्योगिक संवादाला चालना मिळण्यास मदत होते.” या प्रदर्शनात १० देशांतील ३८७ स्टॉल्स आणि २७५ प्रदर्शक सहभागी होत आघाडीच्या ओईएम्स, टियर-१ पुरवठादार, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांच्या नवीनतम नवकल्पना प्रदर्शित करतील.

 

याबरोबरच ‘एसआयएटी २०२६’ च्या प्रदर्शनामध्ये स्टार्टअप्स आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी (MSEs) समर्पित असे वेगेळे पॅव्हेलियन असणार असून यामुळे त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्याची व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग नेत्यांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

 

एसआयएटी प्रदर्शनामध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंन्स सिस्टीम (एडीएएस), एआय, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, सॉफ्टवेअर- ड्रिव्हन मोबिलिटी आणि अॅडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीज यांविषयात काम करणाऱ्या संस्थांसाठी समर्पित असे विशेष तंत्रज्ञान पॅव्हेलियन देखील असेल. याला पूरक म्हणून एसआयएटी एक्स्पोमध्ये सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी भविष्यातील गतिशीलता उपायांशी सुसंगत व प्रगत चाचणी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे पॅव्हेलियन असेल. एसआयएटी एक्स्पोमधील टेक्नॉलॉजी थिएटरमध्ये सादरीकरणे आणि चर्चासत्रे यांचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती एम. आर. पाठक यांनी दिली.

 

भारताच्या ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, ‘एसआयएटी २०२६’ मध्ये एआरएआयमधील अनेक अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन देखील करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस), टेस्ट ट्रॅक स्मार्ट सिटी, सिलेंडर चाचणी आणि हाय एनर्जी इम्पॅक्ट टेस्ट फॅसिलिटी यांचा समावेश आहे. या सर्व सुविधा नजीकच्या भविष्यात एआरएआयच्या वाहनउद्योग सुरक्षितता, शाश्वतता आणि पुढील पिढीच्या गतिशीलता उपायांमध्ये असलेल्या क्षमतांना निश्चितपणे बळकटी देतील.

 

‘एसआयएटी २०२६’ मध्ये वाहनउद्योग क्षेत्रातील नवनव्या घडामोडींचे प्रदर्शन घडविण्यासोबतच ई-मोबिलिटी, हायड्रोजन फ्युएल सेल आणि हायड्रोजन आयसी इंजिन, सिम्युलेशन अँड मॉडेलिंग, इमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्नोलॉजी, अॅडव्हांस व्हेईकल डायनॅमिक्स, अॅक्टीव्ह अँड पॅसिव्ह सेफ्टी, एनव्हीएच, टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, स्ट्रक्चरल रिलायबिलिटी, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (एडीएएस), अल्टरनेटिव्ह फ्युअल्स, इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स (आयटीएस) अँड रेग्युलेशन्स, टायर टेक्नोलॉजी, आणि मेटेरियल्स अँड मॅन्युफक्चरिंग यांसारख्या प्रमुख विषयांचा समावेश असेल.

 

तरुण संशोधकांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी आणि उद्योग तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने परिषदेदरम्यान पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती

ही एम. आर. पाठक यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments