Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे हाउसिंग अहवालात २०२५ (CY २०२५)*  *पुण्यात गृहनिर्माण...

*पुणे हाउसिंग अहवालात २०२५ (CY २०२५)*  *पुण्यात गृहनिर्माण पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक; नव्या प्रकल्पांच्या तुलनेत घरविक्रीत २६% अधिक वाढ*

 

 

* *कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये पुण्यात ६४,००० नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची लॉन्च नोंद झाली, तर अपार्टमेंट नोंदणीची संख्या ८१,००० वर पोहोचली.*

* *नव्या प्रकल्पांच्या तुलनेत घरविक्रीत २६% पेक्षा अधिक वाढ नोंदवली गेल्याने, पुण्यातील गृहनिर्माण मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसूल येते.*

* *देशातील इतर प्रमुख महानगरांमध्ये पुणे हे सातत्याने भारतातील क्रमांक एकचे घरविक्रीचे शहर ठरले असून, त्याचबरोबर सर्वात परवडणारा गृहनिर्माण बाजार म्हणूनही आपले स्थान कायम राखत आहे.*

* *वाढती लोकसंख्या, मजबूत रोजगार परिसंस्था आणि परवडणाऱ्या किंमती यामुळे पुण्याचा निवासी रिअल इस्टेट बाजार दीर्घकालीनदृष्ट्या अधिक सक्षम होत असल्याचे चित्र आहे.*

* *क्रेडाईतर्फे CRE मॅट्रिक्सच्या सहकार्याने पुणे हाउसिंग रिपोर्ट २०२५चे प्रकाशन करण्यात आले.*

 

*पुणे, २३ जानेवारी २०२६ :* पुण्यातील निवासी रिअल इस्टेट बाजारात लक्षणीय रचनात्मक बदल दिसून येत असून, विशेषतः ₹१ कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या प्रीमियम आणि मध्यम आकाराच्या घरांना वाढती मागणी असल्याचे CRE मॅट्रिक्सच्या पुणे हाउसिंग अहवालात नमूद करण्यात आले आहे. कॅलेंडर वर्ष २०२५ (CY २०२५) मध्ये पुणे शहरात ८१,००० पेक्षा अधिक नव्या घरांची विक्री झाली असून, त्यांची एकूण व्यवहार मूल्य ₹६३,००० कोटींपेक्षा अधिक आहे. ही माहिती प्रत्यक्ष IGR नोंदणीकृत विक्री दस्तऐवजांवर आधारित असून, बुकिंग आणि पुनर्विक्री व्यवहारांचा यात समावेश नाही. तसेच, २०२१ च्या तुलनेत विक्री झालेल्या घरांच्या संख्येत जवळपास १९% ची वाढ झाली असून, व्यवहार मूल्यामध्ये तब्बल ७१% अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण व्यवहारांचा वेग कायम असला तरी, खरेदीदारांचा कल आता अधिक प्रशस्त, उच्च मूल्याच्या घरांकडे वळताना दिसत आहे. ही प्रवृत्ती वाढती आकांक्षा आणि उत्पन्न पातळीतील सुधारणेचे द्योतक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

गतवर्ष २०२५ (CY २०२५) मध्ये पुण्यात ₹१ कोटी ते ₹२ कोटी दरम्यानच्या किंमत श्रेणीत १४,००० पेक्षा अधिक घरांची विक्री झाली असून, ₹२ कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या सुमारे ३,३०० घरांची नोंद झाली आहे. यावरून प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण क्षेत्रातील मागणीला भक्कम गती मिळत असल्याचे स्पष्ट होते. ₹१ कोटी ते ₹२ कोटींच्या घरांच्या विक्रीत २०२१ च्या तुलनेत जवळपास चौपट वाढ झाली असून, ₹२ कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीत सुमारे तिप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. उच्च मूल्याच्या घरांच्या खरेदीकडे वाढता कल दिसून येत आहे, तसेच हा कल बाजारातील स्पष्ट सकारात्मक प्रवाह अधोरेखित करतो.

 

कॅलेंडर वर्ष २०२५ (CY २०२५) मध्ये विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ₹७८ लाखांवर पोहोचली असून, गेल्या पाच वर्षांत त्यात सुमारे ४४% ची भक्कम वाढ नोंदवण्यात आली आहे. घरांचे वाढते आकारमान तसेच प्रति चौरस फूट दरांतील वाढ यामुळे ही वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच यामध्ये पुण्याच्या गृहनिर्माण बाजारात सातत्याने प्रीमियमायझेशन होत असल्याचे स्पष्ट होत असले, तरीही खरेदीदारांसाठी मूल्यपर्याय (व्हॅल्यू प्रपोजिशन) टिकवून ठेवण्यात शहर यशस्वी ठरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, देशातील प्रमुख महानगरांमध्ये पुणे अद्याप सर्वात परवडणारा गृहनिर्माण बाजार राहिला आहे. पुण्यातील घरांची सरासरी किंमत ₹७८ लाख इतकी असताना, मुंबईत ती ₹२.२४ कोटी, बेंगळुरूमध्ये ₹१.७१ कोटी आणि हैदराबादमध्ये ₹१.९८ कोटी इतकी आहे. परवडणाऱ्या घरांच्या किंमती असूनही, देशातील सर्वाधिक घर विक्रीची नोंद पुण्यात होत असल्याने, शहराचा निवासी रिअल इस्टेट बाजार देशपातळीवर आपली भक्कम आघाडी कायम ठेवत असल्याचे चित्र आहे.

 

घरांची सरासरी व्यवहार किंमत (अ‍ॅव्हरेज तिकीट साइज) पाहता, पुणे शहरात परवडणाऱ्या किंमत स्तरातही आकांक्षापूर्ण गृहनिर्माण उपलब्ध करून देण्याची आगळीवेगळी क्षमता असल्याचे अधोरेखित होते. यामुळे अंतिम वापरकर्ते (एंड-युजर्स) तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदार या दोघांसाठीही पुणे हे पसंतीचे गृहनिर्माण केंद्र म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत असल्याचे स्पष्ट होते.

 

घर खरेदीदारांचा कल जरी अधिक प्रशस्त अपार्टमेंट्सकडे वळलेला असला, तरीही वर्षभरात विक्री झालेल्या एकूण घरांपैकी जवळपास ७८% घरे ही ₹१ कोटींपेक्षा कमी किमतीच्या श्रेणीत असल्याचे चित्र आहे. यावरून इतर प्रमुख महानगरांच्या तुलनेत पुणे शहराची परवडणूक क्षमता अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. मात्र, ₹५० लाखांखालील, ₹७५ लाखांपर्यंतच्या तसेच ₹1 कोटींपेक्षा कमी किमतींच्या श्रेणीतील घरांची मागणी काहीशी स्थिरावली असताना, प्रीमियम गृहनिर्माण विभागात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विकासकांचे पोर्टफोलिओही अधिक मोठ्या घरांच्या रचनांकडे झुकताना दिसत आहे. नव्या प्रकल्पांमध्ये ३ आणि ४ बेडरूम असलेल्या घरांचा वाटा २०% वरून २९% पर्यंत वाढला आहे. १ बेडरूम असलेल्या घरांचा वाटा १८% वरून आता ११% पर्यंत घटला आहे. परिणामी, गेल्या पाच वर्षांत पुण्यात नव्याने सुरू झालेल्या घरांचे सरासरी क्षेत्रफळ सुमारे १७ टक्क्यांनी वाढले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

मागील वर्षात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसेच आसपासच्या ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पर्यावरणीय मंजुरी आणि इतर आवश्यक परवानग्यांच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती लागली होती. त्यानंतर सीमांकन (डिमार्केशन) मंजुरींमध्ये झालेल्या विलंबामुळे पुण्यात नव्या प्रकल्पांच्या संख्या तुलनेने कमी राहिली. तथापि, या अल्पकालीन पुरवठा-संबंधित अडथळ्यांनंतरही पुणे जिल्हा देशातील नियामक हालचालींच्या बाबतीत आघाडीवर कायम आहे. देशातील सर्वाधिक महारेरा (MahaRERA) नोंदणीकृत प्रकल्प आणि एजंट्स पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आहे. २०२१ पासून दरवर्षी सातत्याने १००० हुन अधिक नव्या प्रकल्पांची नोंदणी होत आहे, यावरून पुण्यातील गृहनिर्माण बाजाराबाबत विकासकांचा मजबूत आणि दीर्घकालीन विश्वास कायम असल्याचे स्पष्ट होते.

 

या अहवालावर प्रतिक्रिया देताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, “पुणे शहराच्या आसपास अल्प अंतरावर अनेक पर्यटन व मनोरंजन स्थळे उपलब्ध असल्यामुळे येथे राहण्यासाठी पुणे शहर अत्यंत आकर्षक ठरते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दळणवळणात मोठी सुधारणा होणार असून त्यामुळे पुण्याचे आकर्षण आणखी वाढताना दिसणार आहे. तसेच, रिंग रोडसारख्या आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुण्याच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यता अधिक बळकट होत असून, शहराचा विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाणार आहे”

 

पुणे हे ना राजधानीचे शहर आहे, ना बंदरनगरी तरीही उत्तम जीवनमानाच्या शोधात असलेल्या नागरिकांना हे शहर सातत्याने आकर्षित करत आहे. आल्हाददायक हवामान, तुलनेने परवडणाऱ्या घरांच्या किंमती आणि मजबूत रोजगार परिसंस्था या घटकांच्या आधारावर पुण्याची लोकप्रियता कायम आहे. सध्याचे बाजारातील प्रवाह स्पष्टपणे दर्शवतात की घर खरेदीदार अधिक आकांक्षापूर्ण होत असून, केवळ परवडणाऱ्या घरांपुरते मर्यादित न राहता आता मोठ्या आणि अधिक प्रशस्त घरांकडे त्यांचा कल वाढत आहे. चालू वर्षात घरांच्या विक्रीत दिसणारी कोणतीही घट ही मागणी कमी झाल्याचे लक्षण नसून, ती प्रामुख्याने तात्पुरत्या पुरवठा-संबंधित अडचणींमुळे आहे. दरम्यान, मध्यम आणि प्रीमियम गृहनिर्माण विभागातील मागणी सातत्याने मजबूत होत असल्याचे दिसून येते.

 

अहवालाबाबत बोलताना CRE मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिषेक किरण गुप्ता म्हणाले, “संपूर्ण भारतातील सध्याचा मालमत्ता बाजार चक्र आरोग्यदायी स्थिरीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करत असून, पुणे शहरही या व्यापक प्रवाहाशी सुसंगतपणे पुढे जात आहे. मात्र, पुण्याची दीर्घकालीन विकासाची दिशा विशेषत्वाने लक्षवेधी आहे. २०२१ मध्ये सुमारे ६५,००० अपार्टमेंट्सची विक्री झाली होती, ती २०२३ मध्ये जवळपास ९६,०००० पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर २०२५ मध्ये ही विक्री सुमारे ८१,००० युनिट्सवर स्थिरावली आणि ही पातळी २०२२ पूर्वीच्या टप्प्यांच्या तुलनेत अद्याप लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे ते म्हणाले.”

 

तसेच ते पुढे म्हणाले “अलीकडील उच्चांकी टप्प्याच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत सुमारे १२ ते १५ टक्क्यांची घट झाली असली, तरी व्यवहार मूल्यामध्ये केवळ सुमारे ६ टक्क्यांचीच घट नोंदवण्यात आली आहे. यावरून बाजारातील मागणीची गुणवत्ता आणि मजबुती स्पष्टपणे दिसून येते. हा टप्पा मागणीतील कमकुवतपणामुळे आलेला नसून, खरेदीदारांच्या पसंतीत होत असलेल्या नैसर्गिक बदलांचे प्रतिबिंब आहे. ₹५० लाखांखालील किंमत श्रेणीतील घरांना तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असताना, प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण विभागात जोरदार गती दिसून येत आहे. पुण्याचा गृहनिर्माण बाजार स्पष्टपणे उत्क्रांतीच्या टप्प्यात असून, खरेदीदार अधिक मोठ्या आणि उच्च मूल्याच्या घरांची निवड करत आहेत. ही प्रवृत्ती वाढती समृद्धी, परिपक्व होत चाललेल्या ग्राहक पसंती आणि शहराच्या भविष्यातील विकासाबाबतचा दृढ विश्वास दर्शवते.”

 

CRE मॅट्रिक्सचा पुणे हाउसिंग रिपोर्ट रामकुमार राठी सभागृहात आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आला. हा अहवाल श्री.अभिषेक गुप्ता, श्री. कपिल गांधी, श्री. इशान मगर आणि श्री. राहुल अजमेरा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला. यावेळी क्रेडाईच्या ५५ विकासक सदस्यांची उपस्थिती होती.

 

विकासक आणि डेटा तज्ज्ञ असलेले श्री. राहुल अजमेरा यांनी सांगितले, महारेरा न्यू लॉन्चेस रिपोर्ट (जानेवारी २०२६) नुसार विकासकांच्या धोरणामध्ये अधिक प्रशस्त घरांकडे स्पष्ट कल दिसून येत आहे. ३ आणि ४ बीएचके घरांचा वाटा २० टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला असून, १ बीएचके घरांचा वाटा १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत घटला आहे. यावरून घर खरेदीदारांच्या पसंतीत होत असलेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. तसेच, किरकोळ दुकाने (रिटेल शॉप्स) यांच्या नव्या लॉन्चचा वाटा ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढला असून, वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकल्पांची अंमलबजावणीही मजबूत राहिली असून, २०२५ मध्ये सुरू झालेल्या सुमारे ४०% प्रकल्पांमध्ये आणि २०२४ मध्ये सुरू झालेल्या सुमारे ६५% प्रकल्पांमध्ये उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे. २०२५ मध्ये बाजारात ६४,००० नव्या प्रकल्पांची लॉन्च नोंद झाली असून, ८१,००० नोंदण्या झाल्या आहेत. यावरून पुरवठ्याचा वेग नियंत्रित असतानाही अंतिम वापरकर्त्यांची मागणी सातत्याने मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट होते.

 

एकूणच पाहता पुण्याचा गृहनिर्माण बाजार आता मोठ्या प्रमाणावर विक्रीवर आधारित परवडणाऱ्या घरांच्या टप्प्यातून बाहेर पडत, मूल्याधारित प्रीमियम गृहनिर्माण चक्राकडे वाटचाल करत आहे. वाढती उत्पन्न पातळी, बदलत्या जीवनशैलीच्या पसंती आणि मर्यादित भू-उपलब्धता या घटकांमुळे हा बदल घडून येत असून, येत्या काळात पुण्याच्या निवासी रिअल इस्टेटचे स्वरूप लक्षणीयरीत्या बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments