Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआरएआयच्या वतीने आयोजित १९ व्या एसआयएटी २०२६ चे उद्घाटन केंद्रीय...

एआरएआयच्या वतीने आयोजित १९ व्या एसआयएटी २०२६ चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले औपचारिक उद्घाटन

पुणे, दि, २७ जानेवारी, २०२६ :केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असलेल्या व देशातील वाहनउद्योगाची प्रमाणन, संशोधन व विकास संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने आयोजित ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६)चे उद्घाटन आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. हे ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ येत्या शुक्रवार दि. ३० जानेवारी, २०२६ पर्यंत मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

आज झालेल्या उद्घाटनपर कार्यक्रमासाठी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व एआरएआय गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रसन फिरोदिया, एआरएआयचे संचालक व एसआयएटी २०२६च्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके आणि एआरएआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

‘इनोव्हेटिव्ह पाथवेज फॉर सेफ अँड सस्टेनेबल मोबिलिटी’ अर्थात ‘सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी नाविन्यपूर्ण मार्ग’ ही एआरएआयच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यावर्षी आयोजित या १९ व्या एसआयएटी २०२६ आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना असून या संकल्पनेखाली जागतिक नेते, तंत्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांना एआरएआयने एकत्र आणले आहे. यावेळी एआरएआयच्या वतीने ग्लोबल ऑटोमोटिव्ह सेफ्टी रेग्युलेशन्स बुक, एसआयएटी २०२६ प्रोसिडिंग्ज, टेक्निकल रेफरन्स बुलेटीन यांचे प्रकाशन एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

आपल्या उद्घाटनपर भाषणात, समारंभाचे प्रमुख पाहुणे एच. डी. कुमारस्वामी यांनी भारताच्या ऑटोमोटिव्ह परिसंस्थेमध्ये ६० वर्षांच्या योगदानाबद्दल ‘एआरएआय’चे कौतुक केले. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकताना, त्यांनी उत्पादन वाढ, निर्यात, प्रगत संशोधन आणि विकास यासोबतच उदयोन्मुख सॉफ्टवेअर-आधारित गतिशीलता उपायांमध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली युरोपियन युनियनशी झालेल्या करारांचा सकारात्मक परिणाम भारतीय आणि युरोपियन या दोन्ही बाजारपेठांवर होईल. तसेच भारतीय वाहन उद्योगाचा विस्तार देशांतर्गत तर होईलच परंतु येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील भारतीय वाहनउद्योग आपला ठसा उमटवेल असा विश्वास देखील कुमारस्वामी यांनी व्यक्त केला.

 

ते पुढे म्हणाले की, “या परिषदेमध्ये वाहन उद्योग क्षेत्रात तांत्रिक सामग्रीची सखोलता यांवर उपस्थित मान्यवर उहापोह करतील. हा परिषदेचा आवाका रोमांचक व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात नवीन ज्ञान आणि कल्पना निर्माण होतील शिवाय विकसित देश बनण्याच्या तसेच निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या आपल्या २०४७ आणि २०७० च्या संकल्पांसाठी देश अधिक वेगाने मार्गक्रमण करताना पहायला मिळेल हे नक्की.”

 

यावेळी एच. डी. कुमारस्वामी यांनी कॅपिटल गुड्स स्कीम, फेम योजना, पीएलआय योजना, पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यांसारख्या उपक्रमांद्वारे भारत सरकार शाश्वत, तंत्रज्ञान-आधारित गतिशीलतेला देत असलेल्या जोरदार पाठिंब्याचा देखील पुनरुच्चार केला. हे सर्व उपक्रम भारताची नाविन्यपूर्ण क्षमता, आत्मनिर्भरता आणि स्वच्छ गतिशीलतेचा आराखडा अधिक मजबूत करत आहेत असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच भारतामध्ये सार्वजनिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची टक्केवारी ही ४० टक्के इतकी आहे, ती कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देत आहेत. आगामी काळात देशभरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याचे नियोजन असल्याचेही एच. डी. कुमारस्वामी यांनी नमूद केले.

 

यावेळी बोलताना शैलेश चंद्रा यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात होत असलेल्या जागतिक बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक स्थानाची नोंद घेतली. भारत आता जगातील तीन चाकी वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक आहे, दोन चाकी वाहनांमध्ये पहिल्या दोन देशांमध्ये, प्रवासी वाहनांमध्ये पहिल्या चार देशांमध्ये आणि व्यावसायिक वाहनांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये आहे, तसेच २०२५ मध्ये देशात विक्रमी वाहन निर्यात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शाश्वत विकास, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि भागधारकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करीत चंद्रा यांनी १९८५ पासून एसआयएटीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ केल्याबद्दल एआरएआयचे कौतुकही चंद्रा यांनी केले.

 

प्रसन फिरोदिया यांनी मंत्री आणि उपस्थितांचे स्वागत करताना, ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी सरकारच्या विविध योजनांमधील भूमिकेची प्रशंसा केली आणि ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या वाढीमध्ये एआरएआयच्या भूमिकेचे कौतुकही केले.

 

एसआयएटी २०२६ दरम्यान एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते एआरएआयच्या वतीने टाकावे येथे उभारण्यात आलेल्या इंटेलिजंट मोबिलिटी टेस्ट सीटीचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले. यामध्ये अनेक अत्याधुनिक मोबिलिटी चाचणी आणि संशोधन सुविधा, प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (एडीएएस), स्मार्ट सिटी चाचणी ट्रॅक, सिलेंडर चाचणी सुविधा आणि उच्च ऊर्जा प्रभाव चाचणी सुविधा यांचा समावेश आहे.

 

वाहन उद्योगाशी निगडीत सुरक्षितता, शाश्वतता आणि पुढील पिढीच्या गतिशीलतेच्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी जागतिक भागधारकांच्या सामायिक जबाबदारीचा पुनरुच्चार डॉ. रेजी मथाई यांनी केला. ‘एसआयएटी २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद एआरएआयच्या हीरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असून साठ वर्षांहून अधिक काळ वाहन उद्योग क्षेत्रातील मानकांना चालना देणे, नाविन्याला सक्षम करणे आणि विश्वास वाढवणे याच्या जोरावर एआरएआय हे भारताच्या मोबिलिटी अर्थात गतिशीलता या परिसंस्थेचा कणा राहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, एसआयएटी एक प्रतिष्ठित जागतिक मंच म्हणून विकसित झाले असून धोरण निर्मिती आणि तांत्रिक प्रगतीमध्ये देखील एसआयएटीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यावर्षी संपन्न होणारी ही परिषदेची १९ वी आवृत्ती हा वारसा निश्चितच पुढे चालू ठेवेल असा विश्वास यावेळी डॉ. मथाई यांनी व्यक्त केला.

 

आतापर्यंत एसआयएटी २०२६ साठी प्रामुख्याने संशोधक आणि अभियांत्रिकी समुदायाकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून या परिषदेत ६०० हून अधिक शोधनिबंधांचा सहभाग असणार आहे. उदयोन्मुख व भविष्यातील वाहनउ द्योग तंत्रज्ञानावर या परिषदेत सखोल तांत्रिक चर्चा होईल तर परिषदेवेळी होणाऱ्या परिसंवादात ३,००० हून अधिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

 

याबरोबरच परिषदेच्या तीन दिवसांत ६४ तांत्रिक व तीन प्लीनरी सत्रांमध्ये या क्षेत्राशी निगडीत महत्त्वाची सादरीकरणे आणि त्यांवरील चर्चा संपन्न होतील. प्रदर्शनात जगभरातील अग्रगण्य वाहनउद्योग कंपन्यांचे तंत्रज्ञानसुद्धा प्रदर्शित केले जाणार आहे. १० देशांमधील २७५ प्रदर्शक, अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करणारे ३८७ बूथ आणि स्टार्टअप्स यासोबतच एसआयएटी २०२६ प्रदर्शनामध्ये (SIAT 2026 EXPO) अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंन्स सिस्टीम (एडीएएस), एआय, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, सॉफ्टवेअर- ड्रिव्हन मोबिलिटी आणि अॅडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीज यांविषयात काम करणाऱ्या संस्थांसाठी समर्पित असे विशेष तंत्रज्ञान पॅव्हेलियन देखील उभारण्यात आले आहे.

 

‘एसआयएटी २०२६’ मध्ये वाहनउद्योग क्षेत्रातील नवनव्या घडामोडींचे प्रदर्शन घडविण्यासोबतच ई-मोबिलिटी, हायड्रोजन फ्युएल सेल आणि हायड्रोजन आयसी इंजिन, सिम्युलेशन अँड मॉडेलिंग, इमिशन मेजरमेंट अँड कंट्रोल टेक्नोलॉजी, अॅडव्हांस व्हेईकल डायनॅमिक्स, अॅक्टीव्ह अँड पॅसिव्ह सेफ्टी, एनव्हीएच, टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, स्ट्रक्चरल रिलायबिलिटी, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (एडीएएस), अल्टरनेटिव्ह फ्युअल्स, इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स (आयटीएस) अँड रेग्युलेशन्स, टायर टेक्नोलॉजी, आणि मेटेरियल्स अँड मॅन्युफक्चरिंग यांसारख्या प्रमुख विषयांचा समावेश असेल.

 

तरुण संशोधकांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी आणि उद्योग तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने परिषदेदरम्यान पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजनही केले जाणार आहे. एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके यांनी आभार मानले. जुही मल्होत्रा यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments