पुणे,28 जानेवारी 2025 : पालवीया फाऊंडेशन तर्फे व भाग्यशाली भविष्य शिक्षण फाऊंडेशन यांच्या सहकार्याने एडब्ल्यूआरटी या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे दुसरे वर्ष असून हा अनोखा कार्यक्रम 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 11 ते सायंकाळी 6.30 दरम्यान पुण्यातील गेणू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालय,बर्मा शेल वस्ती,509 चौक, एअरपोर्ट रोड येथे संपन्न होणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये कलेच्या माध्यमातून विकासाचा सर्वसमावेशक उत्सव साजरा करण्यासाठी लहान मुले,कलाकार आणि समुदाय एकत्र येणार आहेत. एडब्ल्यूआरटी हा वंचित मुलांसाठी एक वस्तीमध्ये आयोजित केलेला एक कला महोत्सव आहे.विविध वस्त्या आणि अनाथाश्रमातील मुले आपली सर्जनशील कला सादर करण्यासाठी एकत्र येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार,31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी नवज्योती इंडिया फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष साईना भरूचा व अमुक-तमुकचे सहसंस्थापक ओमकार जाधव उपस्थित राहणार आहेत.
एडब्ल्यूआरटी महोत्सव हा वस्तीमध्ये साकारलेला समुदायाआधारित कला महोत्सव आहे. वंचित समुदायातील मुलांनी कलेशी जोडले राहून विकसित केलेली कला,कौशल्ये आणि संकल्पना या महोत्सवात सादर केले जाणार आहेत.यंदाच्या महोत्सवात बर्मा शेल वस्तीबरोबरच बालग्राम एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज तसेच इतर वंचित समुदायातील मुलेही सहभागी होत आहेत.यामध्ये अनाथाश्रमातील मुलांचाही समावेश आहे.या महोत्सवात बालपणातील विविध अनुभव एकाच मंचावर सामुहिक व कलात्मक पध्दतीने अनुभवता येणार आहेत.
या दोन दिवसीय महोत्सवात बर्मा शेल बस्ती आणि इतर आसपासच्या परिसरातील कलाकारांचे सादरीकरण होणार असून मुलांचे नृत्य,सामूहिक गीत सादरीकरण,कथानाट्य, सर्जनशील विचार व कलात्मक अभिव्यक्ती,मास्क मेकिंग आणि मेमरी पपेट यांच्या कार्यशाळा,सितार वादन,भरतनाट्यम व मोहिनी अट्टम,रॅप सादरीकरण आणि लाईव्ह बँड परफॉर्मंन्स अशा विविध कलाकृतींचे प्रदर्शन पाहता येणार आहे.
याप्रसंगी बोलताना पालवीया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालिवाल म्हणाले की, कला ही मुलांच्या वाढीला,त्यांच्या स्वप्नांना आणि भविष्यातील कल्पनांना आकार देण्याचे एक सुंदर माध्यम आहे.सातत्यपूर्ण सर्जनशील सहभागातून आम्ही वंचित समुदायांतील मुलांमध्ये आत्मविश्वास आणि दृष्टीकोन विकसित करण्याचे काम करत असून हा फेस्टीव्हल त्या प्रवासाचा सामुदायिक उत्सव आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकार,मुले आणि समुदाय एकत्र येऊन हा अनुभव साजरा करताना पाहणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे.
बर्मा शेल वस्ती येथील नर्सिंग विद्यार्थिनी व मराठी,हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या सानिया शेख या सूत्रसंचालन करणार आहेत.
या दोन दिवसीय महोत्सवात कला प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार असून वंचित समुदायातील मुलांनी तयार केलेली चित्रे आणि कलाकृती प्रदर्शित केल्या
जातील.


