पिंपरी, दि. ३० जानेवारी २०२६ :- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सकाळी ठीक ११ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन मिनिटांसाठी स्तब्ध झाली. शब्द थांबले,हालचाली थांबल्या, भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या पवित्र स्मृती जागवणारा ‘हुतात्मा दिन’ महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पाळण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी अंकुश कदम, कर्मचारी महासंघ प्रतिनिधी विशाल भुजबळ,नागेश जाधव तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी रोजी संपुर्ण देशभर दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात येते,त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देखील आज हुतात्मा दिनानिमित्त सकाळी ठिक ११ पासून दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मौन (स्तब्धता) सुरू होण्यापूर्वी बेल वाजविण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, आस्थापना तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त केला. या उपक्रमाद्वारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली
.


