विद्या महामंडळ संचलित शारदा बालक विहार येथे बाल अभियान गीत गायन बालकथा लेखन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ : शारदा बालक विहारच्या मुख्याध्यापिका शितल पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
पुणे : विद्या महामंडळ संचलित शारदा बालक विहार येथे पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी बाल अभिनय गीत गायन, बालकथा लेखन तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बाल अभिनय गीत गायन स्पर्धेत म.ए.सो.बारामती येथील शिक्षिका अर्चना कूरटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर बालकथा लेखन स्पर्धेत जॅक अँड जिल शाळेच्या प्रमुख ज्योत्स्ना गटणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. आदर्श शिक्षिका पुरस्कार शितल पवार यांना ॲड. अभय आपटे व वसुंधरा काशीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचे स्वरूप ५ हजार रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे होते.
आपटे रोड येथील प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेत्री वसुंधरा काशीकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे, कार्यवाह लीलाधर गाजरे, संभाजी शिंदे, मुख्याध्यापक गौतम मगरे, माजी मुख्याध्यापक मेटे तसेच मुख्याध्यापिका शीतल पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचे परीक्षण सुचरिता पोरे, माधवी कुलकर्णी यांनी केले. तसेच बाल अभिनय गीत स्पर्धेचे परीक्षण मिली सोनी, नीता जोशी, सीमा कुलकर्णी आणि छाया दीक्षित यांनी केले.
बाल अभिनय गीत गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या अर्चना कूरटकर यांना कै. सौ. आपटे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारी मानाची ढाल प्रदान करण्यात आली. स्वरचित गटातील पारितोषिक एन.सी.एल.चे मुकेश जाधव यांनी पटकावले. बालकथा लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक व फिरती ढाल ज्योत्स्ना गटणे यांनी मिळवली. शालांतर्गत गटात रेखा चोरगे यांनी प्रथम, तर सारिका कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.


