पुणे
(प्रतिनिधी)
संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघ “International Year of Volunteering” म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा सहयोग फाउंडेशन आयोजित *“सेवा फेस्ट –२०२६ उत्सव सेवेचा”* हा भव्य सामाजिक महोत्सव शनिवार,१४ फेब्रुवारी रोजी सिंहगड रोड येथील “कलाग्राम” येथे उत्साहात संपन्न झाला. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत चाललेल्या या सेवा- फेस्ट २०२६ उत्सवाला विविध क्षेत्रांतील मान्यवर,स्वयंसेवक,सामाजिक संस्था प्रतिनिधी,सी एस आर अधिकारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात विविध सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मनोगतांनी झाली.याप्रसंगी गरवारे टेक्निकल कॉलेजचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी पुणे,विनोद जाधव के.जे. ग्रुप ऑफ इंजिनियरिंग पुणे,प्रवीण कुलकर्णी प्लांट डी.सी. हेड, इन्फोसिस,सेवा सहयोग फाउंडेशन चे संचालक किशोर मोघे,सेवा फेस्ट २०२६ चे प्रकल्प समन्वयक विनीत कोंडेजकर यांची मुख्य उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात प्रवीण कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवकांनी कुटुंबासोबत सेवा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,यावर विशेष भर देत असे नमूद केले की,यामुळे कुटुंबासाठीचा वेळ कमी होत नाही,उलट मुलांना लहानपणापासून स्वयंसेवेचे महत्त्व समजण्यास आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विकसित होण्यास मदतच होते.
“समुत्कर्ष” प्रकल्पांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सृजनशील सादरीकरणांनी उत्सवाची प्रेरणादायी सुरुवात झाली.
उत्सवादरम्यान “किशोरी विकास” माहिती पुस्तिका,“चेतना” प्रकल्प विभागाचे पुस्तक तसेच “महिला सक्षमीकरण दशकपूर्ती” पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सेवा- सहयोग अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे एकूण ३९ स्टॉल्स उभारण्यात आले होते.जवळपास सात हजारांहून अधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबासह भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेतली व अनुभव नोंदवले.
सेवा फेस्ट २०२६ उपक्रमामध्ये “सी.एस.आर मीट”,”एज्युकेशन मीट” तसेच “सेवा कट्टा” या मुक्त संवाद सत्रांतून सामाजिक क्षेत्रातील विविध विषयांवर चिंतन व मार्गदर्शन झाले.विविध प्रकल्पांची माहिती, यशोगाथा,प्रदर्शन आणि चर्चासत्रांमुळे सेवा क्षेत्रातील समस्या व उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.या उत्सवातून स्वयंसेवकांचा ध्यास,समर्पण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रकर्षाने जाणवली.
उत्सवा दरम्यान विविध सत्रांमध्ये उपस्थित सर्व सहभागी व भेट देणाऱ्या नागरिकांनी समाजाच्या भल्यासाठी शाश्वत बदल घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याची “सेवा प्रतिज्ञा” देखील यावेळी घेण्यात आली
या उपक्रमास खासदार मेधा कुलकर्णी,नगरसेवक कुणाल टिळक,प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी भेट दिली व सेवा – सहयोग सातत्याने राबवित असलेल्या समाजकार्याची प्रशंसा केली.
*“सेवा- फेस्ट २०२६”* हा केवळ एक कार्यक्रम नसून, *समाजातील माणसांना माणसांशी जोडणारी आणि स्वयंसेवेची प्रेरणा देणारी सशक्त चळवळ* ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


