Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअपोलो हॉस्पिटल्स पुणेने जागतिक कॅन्सर महिन्याच्या निमित्ताने सुरु केले 'झिरो टू हिरो'...

अपोलो हॉस्पिटल्स पुणेने जागतिक कॅन्सर महिन्याच्या निमित्ताने सुरु केले ‘झिरो टू हिरो’ अभियान; कॅन्सरचे लवकरात लवकर निदानाबाबत जनजागृतीवर भर

२१ फेब्रुवारी २०२६, पुणे: पुण्यातील पहिले ४०० बेड्सची क्षमता असलेले ‘क्वाटरनरी केअर सेंटर’ असलेल्या अपोलो हॉस्पिटल्स पुणेतर्फे जागतिक कॅन्सर महिन्यानिमित्त ‘झिरो टू हिरो’ या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. कॅन्सरचे अगदी पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कॅन्सरचे लवकरात लवकर निदान झाल्यास त्यावर मात करणे शक्य आहे, या अपोलोच्या विश्वासावर ही मोहीम आधारित आहे. कॅन्सर तपासणी (स्क्रीनिंग), प्रतिबंधासाठी उपाययोजना आणि वेळेत उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमात नामवंत तज्ञ डॉक्टर, कॅन्सरवर मात केलेले नागरिक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत.

 

अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथील ‘ऑन्कोलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध शाखांचे तज्ञ उपलब्ध आहेत, त्यांच्या समन्वयाने याठिकाणी कॅन्सरवर सर्वसमावेशक उपचार केले जातात. हे केंद्र अचूक आणि लवकर निदानासाठी एआय-सक्षम PET-CT, अचूक रेडिएशन थेरपीसाठी VARIAN EDGE LINAC, आणि मूत्रपिंड, स्त्रीरोग, जठरांत्र (Gastrointestinal), तसेच मान व डोक्याच्या कॅन्सरवरील जटिल शस्त्रक्रियांसाठी Da Vinci Xi रोबोटिक प्रणाली यांसारख्या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. प्रगत निदान चाचण्या, अचूक रेडिएशन आणि रोबोटिक शस्त्रक्रियेच्या जोरावर हे केंद्र कॅन्सरचे लवकर निदान, अचूक उपचार आणि जलद रिकव्हरी यासाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा समन्वय साधून तयार केलेला दृष्टिकोन अवलंबते. तंत्रज्ञान-आधारित आणि रुग्ण-केंद्रित सेवेद्वारे कॅन्सरवरील उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सची वचनबद्धता यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते.

 

या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या सीईओ डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या, “कॅन्सरविरुद्धच्या लढाईत त्याचे लवकरात लवकर निदान होणे आणि त्याला प्रतिबंध घातला जाणे ही सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. वेळेत केलेला उपचार रुग्णाचे प्राण वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि ‘कॅन्सरवर मात करता येते’ या अपोलोच्या अनेक वर्षांच्या विश्वासाला बळकटी देतात. मात्र, तपासणी तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. अनेकदा भीती, सामाजिक कलंक, चुकीची माहिती आणि जागरूकतेचा अभाव यामुळे निदानालाच उशीर होतो. अपोलो हॉस्पिटल्स पुणेचा ‘प्रोहेल्थ’ (ProHealth) हा भारतातील पहिला एआय-सक्षम प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम असून, तो प्रगत तपासणी आणि जोखीम मूल्यमापनाद्वारे व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्यास व नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतो.”

 

सिनियर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, रोबोटिक आणि HIPEC स्पेशालिस्ट डॉ. स्निता सिनुकुमार म्हणाल्या, “जवळपास ४० ते ५०% कॅन्सर हे केवळ प्रतिबंधात्मक उपाय, योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणीद्वारे रोखले जाऊ शकतात किंवा त्यांचे लवकरात लवकर निदान होऊ शकते. डिजिटल मॅमोग्राफी, पॅप स्मीअर, लो-डोस सीटी स्कॅन, कोलोनोस्कोपी, पीएसए (PSA) चाचणी आणि मौखिक (oral) तपासणी यांसारख्या चाचण्यांमुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच कॅन्सरचा शोध घेता येतो. जर निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर रुग्णाचे प्राण वाचण्याचे प्रमाण ८० ते ९०% किंवा त्याहूनही अधिक असू शकते.”

 

अपोलो हॉस्पिटल, पुणे येथील ऑन्कोलॉजी टीमने पुढे सांगितले की, “अनेक प्रकारचे कॅन्सर हे योग्य जीवनशैली आणि सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांद्वारे रोखले जाऊ शकतात. तंबाखूचे सेवन टाळणे, अल्कोहोल सेवनावर मर्यादा आणणे, वजन निरोगी राखणे, सक्रिय राहणे, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे, सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण आणि एचपीव्ही व हिपेटायटिस बी सारख्या लसी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने तपासणी आणि आरोग्य मोहिमांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे, तर आरोग्य संस्था, शाळा आणि कामाच्या ठिकाणांनी निरोगी सवयींना प्रोत्साहन देऊन योग्य मार्गदर्शन पुरवणे आवश्यक आहे.”

 

कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वैद्यकीय तपासणी लांबणीवर टाकण्याची प्रवृत्ती टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे; ही प्रवृत्ती विशेषतः पुरुषांच्या आरोग्याबाबत अधिक दिसून येते. विशेष काहीही कारण नसताना वजन कमी होणे, सतत जाणवणारा थकवा, असामान्य रक्तस्त्राव, शरीरावर नवीन गाठ येणे किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा जुनाट खोकला यांसारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे नेहमीच कॅन्सरची असतात असे नाही, परंतु प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाचा कॅन्सर (ज्यांची सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत) अशा आजारांच्या यशस्वी उपचारांसाठी लवकरात लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रगत रोबोटिक शस्त्रक्रियेसारख्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे, आपल्या शरीराकडे लक्ष देणे, ‘पीएसए’ सारख्या सोप्या रक्तचाचण्या करून घेणे आणि कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

 

‘झिरो टू हिरो’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, अपोलो हॉस्पिटल्स पुणेचे उद्दिष्ट जास्तीत जास्त जनजागृती करणे, आरोग्याबाबत तत्पर राहण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि वेळेत पावले उचलण्यासाठी व्यक्तींना सक्षम करणे हे आहे. लवकर निदान आणि प्रगत उपचारांच्या जोरावर कॅन्सरमुक्तीचे प्रमाण सुधारण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने आपली कटिबद्धता या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा सिद्ध

केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments