Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedविज्ञान शिक्षण, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव

विज्ञान शिक्षण, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव

 

 

पुणे, २५ फेब्रुवारी २०२६ : द वंडर स्कूल लर्निंग कलेक्टिव्ह यांनी पॉटर्स अर्थ फाउंडेशनच्या सहकार्याने मुंढवा, पुणे येथील द वंडर स्कूल परिसरात ‘वार्षिक इंडियन स्टेम फेस्ट’ व ‘इंटर-स्कूल इनोव्हेशन एक्स्पो २०२६’चे आयोजन केले. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, होम-स्कूलर्स तसेच स्टेम क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान शिक्षण, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली समस्या सोडविण्याचा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

 

 

 

या स्टेम फेस्टला एका नामांकित कंपनीकडून सीएसआर (CSR) अंतर्गत प्रायोजकत्व मिळाले असून, शिक्षक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वंचित घटकांतील शाळांमधील विज्ञान शिक्षकांना वर्गातील शिक्षण अधिक आकर्षक, अनुभवाधारित आणि विद्यार्थ्यांशी संबंधित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. पॉटर्स अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयआयएसईआर (IISER) पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सत्रे राबविण्यात येत आहेत.

 

 

 

यंदाच्या फेस्टची ‘संकल्पना ‘सायन्स दयाट सॉल्व्ह रिअल प्रॉब्लेम्स’ अशी होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यरत प्रकल्पांच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनाशी निगडित समस्यांवर आधारित उपाय सादर केले. पाणी संवर्धन, वर्ग व्यवस्थापन प्रणाली, शेतीसंबंधित तंत्रज्ञान तसेच सुरक्षिततेवर आधारित प्रोटोटाइप्स अशा विविध विषयांवर नाविन्यपूर्ण उपाय मांडण्यात आले.

 

 

 

या प्रसंगी पॉटर्स अर्थ फाउंडेशनचे संस्थापक सौरभ शर्मा म्हणाले, “स्टेम हे केवळ वैज्ञानिक वा अभियंत्यांसाठी मर्यादित राहिलेले क्षेत्र नाही; ते प्रत्येक मुलासाठी आवश्यक जीवनकौशल्य बनत आहे. डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगात संगीत, डिझाईन आणि कला क्षेत्रालाही तांत्रिक जाण आवश्यक आहे. भविष्यातील रोजगार क्षेत्रात केवळ पदवी नव्हे, तर समस्यासोडवणूक क्षमता आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची समज महत्त्वाची ठरणार आहे. देशातील लाखो मुलांना अद्याप आवश्यक साधनसामग्री व संधी उपलब्ध नाहीत. ही दरी भरून काढणे अत्यावश्यक आहे. सीएसआर (CSR) उपक्रमांनी केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन शैक्षणिक परिसंस्था उभारण्यावर भर द्यायला हवा.”

 

 

 

प्रायोजक कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीएसआर (CSR) प्रमुखांनी सांगितले, “शिक्षणासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्या तरी भविष्यातील घडण ही अध्यापनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. सक्षम आणि पात्र शिक्षकांनी सातत्यपूर्ण व अर्थपूर्ण प्रशिक्षणाद्वारे स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवणे आवश्यक आहे, कारण भक्कम शिक्षण व्यवस्थेची सुरुवात शिक्षकांच्या सक्षमीकरणापासूनच होते. उद्याच्या भारताचे शिल्पकार ही मुलेच आहेत आणि शिक्षकांची जुळवून घेण्याची व परिणामकारकपणे ज्ञान देण्याची क्षमता वाढवून आपण त्या भविष्यात थेट गुंतवणूक करत आहोत. या प्रवासाची सुरुवात करताना काही प्रमाणात साशंकता होती; मात्र विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विचारपूर्वक तयार केलेल्या मॉडेल्सद्वारे विज्ञानाची मांडणी करताना पाहणे अत्यंत समाधानकारक आहे. योग्य प्रशिक्षणातून दीर्घकालीन परिणाम साधता येतात, याची ही खात्री देणारी बाब आहे. आगामी काळात अधिक व्यापक सहभाग आणि लक्षणीय प्रगतीची अपेक्षा आहे.”

 

 

 

यासंदर्भात आयआयएसईआर (IISER) पुणे येथील स्टेम शिक्षणतज्ज्ञ डॉ. चैतन्य मुंगी म्हणाले, “विद्यार्थी वर्गखोल्या, घर, रस्ते किंवा शेतीतील दैनंदिन समस्यांवर उपाय शोधण्याबाबत उत्सुकतेने पुढाकार घेताना दिसत आहेत, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. नवकल्पना आणि प्रत्यक्ष जीवनातील निरीक्षण यांची सांगड त्यांनी प्रभावीपणे घातली आहे. उपलब्ध साधनसामग्रीनुसार त्यांच्या उपाययोजना आकार घेताना दिसल्या—जिथे तांत्रिक साधने उपलब्ध होती तिथे स्वयंचलित पद्धतींचा अवलंब करण्यात आला, तर साधनांची कमतरता असताना साध्या पण विचारपूर्वक आणि परिणामकारक नवकल्पना सादर करण्यात आल्या. मर्यादा अनेकदा सर्जनशीलतेला चालना देतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आयआयएसईआर (IISER) सारख्या संस्थांच्या सहकार्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणल्यास अर्थपूर्ण नवकल्पनांची सुरुवात जागरूकता आणि सखोल आकलनातूनच होते, हे स्पष्ट होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित आणि माहितीसमृद्ध जगात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे, पडताळणी करणे आणि चिकित्सक दृष्टिकोन ठेवणे तितकेच आवश्यक आहे. शिक्षक आणि पालकांसाठी केंद्रित पूर्वतयारी सत्रे तसेच डिजिटल सहभाग वाढवून आपण विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वास्तविक जगात पाऊल टाकण्यास आणि प्रभावी उपाय निर्माण करण्यास सक्षम करू शकतो.”

 

 

 

स्टेम फेस्टमध्ये विज्ञान मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी अधिक सुलभ व रोचक बनविण्यासाठी विशेष इंटरअॅक्टिव्ह लर्निंग झोन्सची उभारणी करण्यात आली होती. या उपक्रमामुळे प्रयोगशीलता, संघभावना आणि जिज्ञासेला प्रोत्साहन मिळाले. विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना आत्मविश्वासाने मांडण्याची तसेच त्या प्रत्यक्षात कशा परिणामकारक ठरू शकतात, हे सादर करण्याची संधी मिळाली.

 

 

 

पुरस्कार विजेते

 

गट अ (इयत्ता ६ वी व ७ वी)

 

पुरस्कार वितरण – शिक्षिका ‘शिक्षा मॅडम’ आणि नरेश सर

 

द्वितीय क्रमांक : ऑटोमॅटिक टँक ओव्हरफ्लो अलार्म सिस्टीम – भारतीया जैन संघटना (BJS) स्कूल, वाघोली

प्रथम क्रमांक : स्मार्ट ड्राय अँड वेट वेस्ट सेग्रिगेटर – विष्णुजी शेकुजी सातव विद्यालय

 

 

गट ब (इयत्ता ८ वी व ९ वी)

 

पुरस्कार वितरण – नरेंद्र आणि वृषाली

 

द्वितीय क्रमांक : स्मार्ट अटेंडन्स क्लासरूम मॉनिटरिंग सिस्टीम – BJS स्कूल, वाघोली

प्रथम क्रमांक : स्मार्ट अ‍ॅग्री रोबोट प्रकल्प – BJS स्कूल, वाघोली

 

 

गट क (मुक्त गट)

 

विविध वयोगटातील विद्यार्थी व स्वतंत्र संशोधकांचा सहभाग.

 

‘धाडसी इनोव्हेटर’ पुरस्कार : मिथिला कदम (वय ९ वर्षे) – नॉन-टॉक्सिक प्ले स्लाइम पर्याय

‘प्रॅक्टिकल सोल्युशन्स क्रिएटर’ : अर्पित – वॉटर डिस्पेंसर

‘टेक गीक’ पुरस्कार : स्मार्ट क्लासरूम प्रकल्प – साधना कन्या विद्यालय, पिंपरी

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि समस्या सोडविण्याची वृत्ती विकसित करण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments