धर्माच्या नावाखाली भारताची फाळणी होऊन पाकिस्तान अस्तित्वात आले. पण त्याच पाकिस्तानची फाळणी
भाषेच्या आधारावर होऊन बांगला देश अस्तित्वात आला. यावरुन मानवी जीवनात मातृभाषेचे महत्व किती आहे हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले.ठाणे येथील
जोशी बेडेकर महाविद्यालयात
आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की,
21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बंगाली मातृभाषेला उर्दू भाषेबरोबरच
राज भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या गोळीबारात पाच विद्यार्थी ठार झाले होते. तेव्हापासून बांगला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याने गती पकडून अखेर 1971 साली
बांगला देश स्वतंत्र झाला. युनेस्कोने मातृभाषेचे महत्व ओळखून 2000 सालापासून
21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तर
महाराष्ट्र शासनाने देखील मातृभाषा मराठीला यथोचित गौरव प्राप्त व्हावा यासाठी आयुष्य वेचणार्या जेष्ठ साहित्यिक, नाटककार वि वा शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून 2013 सालापासून साजरा करण्यास सुरुवात केली. अर्थात आपल्या मातृभाषेचा अभिमान म्हणजे अन्य भाषांचा दुस्वास करणे असे नसून बहु भाषिक होण्यानेच
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी श्री भुजबळ यांच्या हस्ते काही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केलेल्या
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी
पालखीत विसावलेल्या माऊलीला खांद्यावर घेऊन ग्रंथ दिंडी काढली.
लाभले आम्हास भाग्य, अभिजात मराठी भाषेचा जयजयकार असो अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
नंतर सुरू झाला गायन, नृत्य, नाट्य ह्यांचा आविष्कार. बासरीच्या मधुर स्वरांनी कार्यक्रमाला सुरवात झाली. पारंपारिक कोळी नृत्य, लावणी, भारुड, अभंगरूपात नृत्य अश्या अनेक कलाकृती सादर केल्या गेल्या . छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा संघ्यानी जाधव हिने सादर केला आणि त्यावर नाट्य सादरीकरण करण्यात आले. ज्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.
ह्यावेळी मराठमोळी संस्कृती, लोककला यांचे २१ कला प्रकार सादर करण्यात आले.
ह्या सर्व सादरीकरणाना उस्फूर्तपणे दाद मिळत होती.
सर्व कला प्रकारांना दीपेश पाटील आणि मंडळींनी उत्तम साथ संगत केली .
यश बंदरकर या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्रांगणात सुंदर अशी मराठी भाषा गौरव दिनाची रांगोळी रेखाटली होती. अनिरुद्ध नाईक यांनी सुंदर देखावे सादर केले.
समिधा पाटील आणि आश्लेषा माने ह्यांनी उत्तम निवेदन केले. प्रा. रूपेश महाडिक ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
ह्या कार्यक्रमासाठी उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर , उपप्राचार्य डॉ. महेश पाटील ह्यांची उपस्थिती लाभली होती.
प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आणि मराठी भाषा आणि साहित्य विभाग प्रमुख डॉ.संतोष राणे ह्यांच्या सहकार्याने झाले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रा. रूपेश महाडिक आणि प्रा. राजश्री माने ह्यांनी केले. मराठी विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांचे सहकार्य ह्या कार्यक्रमाला लाभले.


