पिंपरी, १८ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना कचरा विलगीकरणाचे प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ.प्रदीप ठेंगल, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी कचरा अशा चार प्रकारांमध्ये कचरा वेगळा करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
भविष्यात जबाबदार आणि वसुंधरेबाबत जागरूक नागरिक घडवण्यासाठी शालेय स्तरावरच योग्य सवयी रुजवणे गरजेचे आहे. याच उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कचरा विलगीकरण आणि होम कंपोस्टिंग प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येत आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले जात असून शाळा परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यावर भर दिला जात आहे. तसेच ‘झिरो वेस्ट स्कूल’ ही अभिनव संकल्पना राबवून शाळांमधील कचरा कमी करण्याचा आणि त्याचा योग्य प्रकारे पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, वसुंधरा संरक्षण आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत असून भविष्यात हे विद्यार्थी समाजातही कचरा विलगीकरणाचा संदेश पोहोचवतील, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
……
कोट :
स्वच्छ शहर घडवण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. मनपा शाळांमधून ‘झिरो वेस्ट स्कूल’ सारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. विद्यार्थीच पुढे जाऊन समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचवतील.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
……………….
कोट:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये कचरा विलगीकरण आणि वसुंधरा संवर्धनाच्या सवयी रुजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी जर लहानपणापासून या गोष्टी शिकले, तर भविष्यात शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी मोठी मदत होईल.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


