Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाघोलीत मातृशक्तीच्या हस्ते ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ* ...

वाघोलीत मातृशक्तीच्या हस्ते ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ* *कुस्तीची परंपरा जपत महाराष्ट्राचा झेंडा जगात फडकवा – सुनेत्रा पवार यांचे आवाहन*

 

 

*सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांच्या उपस्थितीत रंगला सोहळा, विजेत्यांना आकर्षक बक्षिसांची घोषणा*

 

 

पुणे, १८ मार्च २०२६ :रामकृष्ण सातव पाटील यांच्या आयोजनातून वाघोली येथे ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज मातृशक्तीच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास व परिवहन राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी सतिश मिसाळ, पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ” कुस्तीची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या कुस्तीतूनच पाहिले ऑलिम्पिक आपल्या देशाला मिळाले. या महाराष्ट्रात अनेक दिग्गज मल्ल या कुस्तीतून घडले आहेत. कुस्तीची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय दादांची कायम भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा प्राप्त झाली . आदरणीय दादांच्या क्रीडा प्रेमाचा आणि तळमळीचा वारसा आपण सगळ्यांनीच पुढे नेऊयात. वाघोलीच्या स्पर्धेचे आयोजन खरंतर अत्यंत दिमागदार पद्धतीने करण्यात आलं त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा मी विशेष अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या यंदाच्या महाराष्ट्र केसरींना आपल्या सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते रविवारी दिनांक 22 मार्च रोजी बक्षीस वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन करताना खर तर मी एवढेच आवाहन करते की खेळाडूंनी आखाड्यामध्ये प्रामाणिकपणा दाखवा. आपला खेळ अतिशय चांगल्या प्रकारे सादर करा, आपल्या महाराष्ट्रचे नाव जगामध्ये उज्वल करा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मल्लांना त्यांच्या प्रशिक्षकांना मनापासून शुभेच्छा देते”.

 

 

मंजुषा नागपुरे म्हणाल्या , ” हा सोहळा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सवाचा आहे. महाराष्ट्र केसरीची परंपरा आजही आपण जपतो हीच खरी आदरांजली आहे. खेळाडूंना आपण योग्य to सन्मान म्हणून जिम कीट, त्याची संपूर्ण व्यवस्था आपण उत्तम पद्धतीने केली आहे. कुस्ती जोपासणे ही वाघोलीची परंपरा आहे. जागतिक स्तरावर कुस्तीला ग्लामर मिळणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्र केसरी ठरलेले स्पर्धक पुन्हा यंदाच्या स्पर्धेत भाग घेत असल्याने यंदाची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा रंजक ठरणार आहे”.

 

रामकृष्ण सातव पाटील म्हणाले,” नेहमी कुस्ती स्पर्धेला महिला भगिनींची संख्या कमी असते मात्र या वर्षी महिलांची संख्या खूप वाढली आहे. कुस्ती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे ही संकल्पना होती त्यातूनच आज 4000 हजार महिलांचा सहभाग आज इथे झाला आहे . प्रथमताच कुस्ती स्पर्धेत महिलांचा गौरव होतं आहे.यंदाची स्पर्धा गावातील दानशूर व्यक्तीमुळे ही एवढी भव्य दिव्य होतं आहे”.

 

या स्पर्धेची सुरुवात स्व. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी केली होती. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत रामकृष्ण सातव पाटील यांच्या नेतृत्वाखाली यंदाची ६८वी स्पर्धा भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडानगरीला “स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी” असे नाव देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

यंदाच्या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर गाडी, उपविजेत्याला स्कॉर्पिओ N, तसेच विविध गटांतील सुवर्णपदक विजेत्यांना १८ बुलेट आणि रौप्य पदक विजेत्यांना स्प्लेंडर गाड्या देण्यात येणार आहेत. या बक्षिसांसाठी वाघोली ग्रामस्थ व हवेली तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी योगदान दिले आहे.

 

स्पर्धेदरम्यान तरुणांसाठी फोटोग्राफी, रॅप यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

यावेळी प्रमुख उपस्थितीत मा. सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ, शिरूर हवेली आमदार माऊली कटके, मा. सौ. संजीला बापुसाहेब पठारे, मा. श्रीमती मालतीताई बाबुराव पाचर्णे, मा. सौ. सुजाता अशोक पवार, मा. सौ. मनीषा ज्ञानेश्वर कटके, मा. सौ. पूजा प्रदीप कंद उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सन्माननीय पुणे मनपा नगरसेविका मा. सौ. श्रेयस प्रितम खांदवे, मा. सौ. ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, मा. सौ. रत्नमाला संदीप सातव, मा. सौ. तृप्ती संतोष भरणे यांनी आयोजनाची धुरा सांभाळली.

 

तसेच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. सुरेखा रमेश हरगुडे, मा. सौ. कोमल संदेश आव्हाळे, मा. सौ. शितल सुजित कांबळे, मा. सौ. रुपाली रमेश कोंडे यांची उपस्थिती होती. पंचायत समिती सदस्यांमध्ये मा. सौ. विद्या दत्तात्रय गायकवाड, मा. सौ. सुषमा संतोष मुरकुटे, मा. सौ. कोमल गणेश कांबळे, मा. सौ. मोनिका श्रीकांत कंद, मा. सौ. राणी दत्तात्रय वाळके आणि मा. सौ. शुभांगी राजू खिरीड उपस्थित होत्या.

 

मातृशक्तीचा गौरव या संकल्पनेवर आधारित हा उद्घाटन सोहळा वाघोलीतील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला. १८ ते २२ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments