पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांचे गुरु ज्येष्ठ कुस्तीपटू काका पवार हे देखील उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, श्रीराज रासने, राजाभाऊ पायमोडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन सदगीर म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आल्यावर मनाला शांती मिळते. गणपती बाप्पाच्या आशिर्वादामुळे मी महाराष्ट्र केसरी जिंकलो. सन २०१९-२० ला मी महाराष्ट्र केसरी जिंकलो होतो. त्यानंतर माझे गुरु काका पवार यांनी मला पुढची तयारी करण्यास सांगितले आणि लढण्याचे बळ दिले. त्यामुळे पुन्हा कुस्ती करायची हे मिशन ठेवून मी लढलो आणि जिंकलो.


