Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी*

पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी*

 

 

पुणे, दि. २४ मार्च २०२६ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन बॅचेस १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या माध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. ८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात अधिक उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मागणी आधारित (डिमांड ड्रिव्हन) असून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत कौशल्ये उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत.

 

या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

 

या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री. सु.रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच (०२०) २६१३३६०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments