Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम शनिवारपासून सोलापूरनगरीत!*

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम शनिवारपासून सोलापूरनगरीत!*

 

 

• *अपेक्षा, ज्योती, सृष्टीची जेतेपदावर कडवी दावेदारी*

• *भाग्यश्रीच्या अनुपस्थितीत गतउपविजेत्या अमृता पुजारीने अपेक्षा उंचावल्या*

• *प्रतीक्षा, वेदिका, अंकिता आणि कामिनीला थेट प्रवेशिका*

• *महाराष्ट्र केसरी विजेतीला किया सोनेट कार आणि उपविजेती बुलेटची मानकरी ठरणार*

• *प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस*

 

*सोलापूर, दिनांक २७ मार्च*

सोलापूर येथे सिध्दाराम साखरे यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाऊंडेशनच्या यजमानपदाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे २८ आणि २९ मार्चला होणाऱ्या चौथ्या वरिष्ठ गट महिला महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या महासंग्रामासाठी सोलापूरनगरी सज्ज झाली आहे. हा प्रतिष्ठेचा किताब जिंकण्यासाठी अपेक्षा पाटील, अमृता पुजारी, सृष्टी भोसले, सोनाली मंडलिक, ऋतुजा बिल्ले, ज्योती यादव, सिद्धी होळकर, रोशनी बोडके, ऋतुजा पवार, श्रद्धा काशिद या कुस्तीपटू कडवी दावेदारी करतील. याचप्रमाणे प्रतीक्षा बागडी (सांगली), वेदिका सासणे, अंकिता फातले (दोघी कोल्हापूर) आणि कामिनी देवीकर (अहिल्यानगर) यांना थेट प्रवेशिका (वाइल्ड कार्ड) देण्यात आल्या आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडच्या अनुपस्थितीत गतउपविजेत्या अमृता पुजारीने अपेक्षा उंचावल्या आहेत.

 

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीपटूला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब, मानाची चांदीची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरवण्यात येणार आहे, तर उपविजेत्या कुस्तीपटूला बुलेट दुचाकी दिली जाईल. याशिवाय प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ३५०हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी दिली.

 

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके दिली जाणार आहेत.

 

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे असतील. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके आणि जिल्हाध्यक्ष अस्लम काझी यांच्यासह राज्य कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

 

“या स्पर्धेसाठी निर्झरा केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत. या स्पर्धेसाठी दोन मॅट्स, वजन चाचणी, निवास, भोजन, आदी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे,” असे स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले.

 

स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३ मध्ये स्थापना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments