Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएच्या विद्यार्थिनींनी केला गुंडाळवाडीतील पारंपरिक शाश्वत घरांचा अभ्यास त्यावरील दस्तावेज व माहिती...

बीएनसीएच्या विद्यार्थिनींनी केला गुंडाळवाडीतील पारंपरिक शाश्वत घरांचा अभ्यास त्यावरील दस्तावेज व माहिती लवकरच ग्रामीण विकास मंत्रालयाकडे सादर करणार

पुणे, दि. २ एप्रिल २०२६ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकांनी पुणे जिल्ह्यातील गुंडाळवाडी गावातील दगड, माती, चुना, विटांच्या पारंपरिक, पर्यावरणपूरक तसेच शाश्वत पद्धतीने बांधलेल्या घरांचे दस्तावेजीकरण केले आहे. एवढेच नव्हे तर गावाला याच शाश्वत पद्धतीचा वापर करून तेथील सार्वजनिक सभागृह व पंचायत समितीचे कार्यालयही बांधून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. गेली चार वर्षे गुंडाळवाडी व आसपासच्या बोरीबुद्रूक (जुन्नर तालुका), ढाकाळे (बारामती तालुका) आणि पारगाव (आंबेगाव तालुका) या आणखी तीन गावांमधील पारंपरिक बांधकामाचे दस्तावेजीकरण केले असून त्याचा माहितीपूर्ण तपशील बीएनसीएतर्फे राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयासमोर सादर करण्यात येईल.

गेल्याच वर्षी बीएनसीएने आर्किटेक्चरची मातृसंस्था म्हणजे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे (सीओए) आयोजित स्पर्धेत गुंडाळवाडीतील या वारसा दस्तावेजीकरणाच्या कामाला प्रथम पुरस्कार मिळवला होता.

बीएनसीए तर्फे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून असलेल्या या सामाजिक कार्याबद्दलचा अभिमान प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, यातून आमच्या विद्यार्थिनींना आम्ही सुरुवातीपासूनच पारंपरिक व पर्यावरणपूरक अशा शाश्वत बांधकामाबाबत माहिती देत असतो. आतापर्यंत गुंडाळवाडी व अन्य गावांमधील झालेल्या अभ्यासाचा लाभ आर्किटेक्चरच्या अभ्यासकांबरोबर सरकारलाही व्हावा हा त्यामागचा आमचा हेतू आहे.

बीएनसीएने हा अवघा उपक्रम उर्वी पब्लिक ट्रस्टबरोबर हाती घेतला असून त्यामध्ये स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कॉस्टफर्ड (केरळ), ऑरोव्हील अर्थ इन्स्टिट्यूट (पाँडेचरी) आणि हुन्नर गुरुकुल (सासवड) यांच्याशीही समन्वय साधला आहे. नुकताच गावातील पारंपरिक घरांचे या प्रकल्पाची माहिती देणारे प्रदर्शन

बीएनसीए तर्फे गुंडाळवाडी येथे भरवण्यात आले असून ते पाहण्यासाठी आसपासच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते व शिक्षक आले होते. त्यांनी या कामाचे मुक्त कंठाने कौतुक केले. त्यामध्ये शाश्वत बांधकाम पद्धतीचे अभ्यासक आर्किटेक्ट भारत बहेती, उर्वी संस्थेच्या संस्थापक सचिव अमृता नायडू, सह्याद्री स्कूलचे मिलिंद मोरे आणि दीपा मोरे हे शिक्षक आणि फोरटीन ट्रीज या संस्थेचे संस्थापक संचालक प्रविण भागवत यांनीही या प्रदर्शनाच्या उपयुक्ततेची प्रशंसा केली.

प्रा. सायली कुलकर्णी म्हणाल्या की, अवघे १५०० घरे असणाऱ्या वस्तीचे हे गाव गेल्या काही शतकांमध्ये कसे वसले असेल ह्या पार्श्वभूमीवर नवीन होणारा विकास ह्याबद्दल गावातील लोकांशी चर्चा होते. बांधकामात होणारे बदल व त्याचे कारण आणि फायदे-तोटे सर्वांसमोर मांडले जातात. या अभ्यासाला अंतीम स्वरूप देताना लोकसहभागातून तेथील वास्तू पर्यावरणपूरक पद्धतीने बांधण्यात बीएनसीए सहभागी होत आहे. बांधकामात झालेला अभ्यास व या अभ्यासातून केलेल्या विश्लेषणाच्या आधारे त्यावर एक दस्तावेज तयार करण्यात येत आहे.

गेल्या चार वर्षातील केलेल्या कामाचा तपशील सांगताना प्रा. कुलकर्णी म्हणाल्या की, गावातील बांधकामाचे सर्वेक्षण करताना पारंपरिक वास्तूंचे जतन व संवर्धन करून नवीन कारणासाठी वापर करणे कसे शक्य आहे, तेही गावापुढे मांडले. या पर्यावरणस्नेही बांधकामाचे याचे प्रात्यक्षिक आमच्या विद्यार्थिनींनी स्थानिक बांधकाम कंत्राटदारांपुढे सादर केले. या वर्षी गुंडाळवाडीतील मागणीनुसार तेथील पंचायत कार्यालय, सार्वजनिक सभागृह आणि बसस्टॉप याचा शाश्वत पद्धतीने बांधकाम रचनेचा प्रस्ताव बीएनसीएच्या विद्यार्थिनींनी उर्वी पब्लिक ट्रस्टच्या मार्गदर्शनातून सादर केला.

त्यापुढे म्हणाल्या की, पारंपरिक शाश्वत बांधकामपद्धतीची या सर्व अभ्यासामुळे गावातील लोकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे शक्य होते. ह्या अभ्यासाचे रूपांतर प्रत्यक्षात होण्याकरता ग्रामीण विकास मंत्रालय व इतर नामांकित संस्थांबरोबर चर्चा करून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी बीएनसीए व विद्यार्थिनी उत्सुक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments