पुणे : आजारांपासून लांब राहण्यासाठी रसायनमुक्त शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक खतांमुळे एकदा माती खराब झाली तर कोणताही डॉक्टर ती चांगली करू शकत नाही. आज पैसे देऊन आपण आजार विकत घेतो. विषमुक्त जेवणाचे ताट याबद्दल आपण आज जागृत झालो नाही तर पुढच्या पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. आपण बदललो तर निसर्ग देखील बदलेल. त्यामुळे निसर्गाला धरून चालले पाहिजे. निसर्ग हा माझा गुरु आणि तोच माझा तारु आहे,असे मत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.
लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. याशिवाय प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचा मानपत्र व आचार्य पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ.पराग काळकर यांचा देखील सत्कार यावेळी झाला.
राहीबाई पोपेरे म्हणाल्या, पैसा कितीही कमवला तरी तो आपण खाऊ शकत नाही, मातीच आपल्याला अन्न देते. प्रत्येक गावात बीज बँक झाली पाहिजे. निसर्गाला धरून आपली वाटचाल असली पाहिजे, आपण बदललो तर निसर्ग देखील बदलेल. निसर्ग हा माझा गुरु आणि तोच माझा तारु आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, संस्कार करणे आणि ते जपण्याचे काम माता आणि गृहिणीच करू शकते. याची जागृती करणे आवश्यक आहे. मी काय करू शकते आणि समाजाला काय देऊ शकते याचा विचार करण्याची प्रेरणा आपल्याला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत मिळते. संत मंडळी आपल्या देशात आहेत त्यांचे विचार आपल्याकडे आहेत तो पर्यंत कोणीही आपले काहीही बिघडवू शकत नाही. दगडुशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट मध्ये अनेक चांगले उपक्रम होतात. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
श्रीनिवास पाटील म्हणाले, पुणे हे शहर समानतेचे, लोकमान्य टिळकांचे, महात्मा फुले, सावित्री बाईंचे आणि जिथे फातिमाबी या फुले वाड्यात शिकवत होत्या यांचे आहे. दगडूशेठ दत्त मंदिराच्या वतीने लोकमाता, बीज माता यांचा सन्मान होत आहे. लक्ष्मी मातेने सरस्वती मातेचा केलेला हा सन्मान आहे.
बाबासाहेब तराणेकर म्हणाले, विज्ञाननिष्ठ असताना अध्यात्माकडे कसे वळलो असे मला विचारले जाते, परंतु माझ्या अनेक थीसिसच्या वेळी मला दोन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथाचा आधार मिळाला. ही आपल्या अध्यात्म आणि संस्कृतीची महानता आहे. दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टची वाटचाल मागील अनेक वर्षांपासून पाहत आहे. त्यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्रिपदी परिवार यापुढेही ट्रस्ट सोबत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोरेश्वर घैसास म्हणाले, समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची योग्य निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे काम ट्रस्ट च्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपले काम करीत आहेत.
सुनील देवधर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे समाजातील योग्य व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येत आहेत. यापूर्वी प्रोफाइल, फाईल्स यामुळे पुरस्कारांसाठी पैशांचे व्यवहार व्हायचे. परंतु मोदी सरकार मुळे खरे पद्म मानकरी पुढे आले. १२ जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचा देखील मोठा कार्यक्रम पुण्यात करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वस्त ॲड शिवराज कदम जहागीरदार यांनी आभार मानले.