Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*तळागाळातील आरोग्यासाठी झटणाऱ्या 'सेवा आरोग्य फाउंडेशन'ची दशकपूर्ती*  *१८ एप्रिल रोजी कर्वेनगरमध्ये...

*तळागाळातील आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’ची दशकपूर्ती*  *१८ एप्रिल रोजी कर्वेनगरमध्ये विशेष सोहळा* पुणे

 

पुणे

(प्रतिनिधी)

समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांना त्यांच्याच वस्तीत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’च्या निःस्वार्थ कार्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या उल्लेखनीय प्रवासाच्या ‘दशकपूर्ती’ निमित्त संस्थेचा दहावा वर्धापन दिन आणि स्नेहमेळावा शनिवार,१८ एप्रिल २०२६ रोजी कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘ॲम्फी थिएटर’मध्ये संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत हा विशेष सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) चे संघटनमंत्री पराग कंगले उपस्थित राहणार आहेत. तसेच,प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या संजीवन होमिओपॅथी हेल्थकेअर अँड रिसर्च आणि डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन (नारायणगाव) चे प्रमुख विश्वस्त डॉ संजीव डोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

‘पंचकोशांच्या’ तत्त्वावर सर्वांगीण विकास

गेल्या एका दशकात ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’ने केवळ रुग्णांवर गोळ्या-औषधांचे उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता, मानवी अस्तित्वाच्या ‘पंचकोश’ (शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि आत्मिक) विकासाचे ध्येय बाळगले आहे. संस्थेच्या माध्यमातून आज शहरातील अनेक वस्त्यांमध्ये ‘आरोग्यवर्धन’ प्रकल्पांतर्गत अल्पमूल्य दवाखाने, फिजिओथेरपी आणि आयुर्वेद चिकित्सालये अत्यंत यशस्वीपणे चालवली जात आहेत. विशेषतः अर्धांगवायू (Paralysis) आणि गंभीर आजारांच्या रुग्णांना या ओपीडींचा (OPD) मोठा फायदा झाला असून, गरिबांची महागड्या उपचारांतून सुटका झाली आहे.

आरोग्यासोबतच वस्तीतील किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘घे भरारी’, शालेय विद्यार्थ्यांच्या योग्य करिअर मार्गदर्शनासाठी ‘सांगाती’ (Mentoring) आणि लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘समृद्धी वर्ग’ असे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्था चालवत आहे.या सर्व प्रकल्पांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे,वस्तीत राहणाऱ्या आणि ‘चूल आणि मूल’ या चौकटीत अडकलेल्या अनेक महिला आज ‘आरोग्य मैत्रीण’ आणि ‘ताई’ म्हणून या सेवाकार्याचे सक्षमपणे नेतृत्व करत आहेत.कोरोनाच्या भीषण काळातही सेवा आरोग्य च्या कार्यकर्त्यांनी वस्तीमध्ये स्वतःचे जीव धोक्यात घालून अखंडपणे दवाखाने आणि प्रत्यक्ष मदतकार्य सुरू ठेवले होते.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये संस्थेचे आतापर्यंतचे सर्व कार्यकर्ते,आरोग्य मैत्रिणी,देणगीदार,तज्ज्ञ डॉक्टर्स आणि हितचिंतकांचा एक मोठा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.या प्रवासात बहुमोल साथ देणाऱ्या दात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा या कार्यक्रमात स्पष्ट केली जाणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, नागरिकांनी महर्षी कर्वे संस्थेच्या ‘रमा पुरुषोत्तम संकुल’च्या गेट क्रमांक १० मधून प्रवेश करावा आणि या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे. अल्पोपाहाराने या कार्यक्रमाची सांगता होईल.अधिक माहितीसाठी नागरिकांना www.sevaaarogya.org या संकेतस्थळावर किंवा ९०७५०८१९७७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

________________

सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेचा संक्षिप्त कार्य अहवाल

पुणे -गेल्या दहा वर्षांपासून कोथरूड, कर्वेनगर,वारजे,उत्तमनगर,बावधन आणि सिंहगड रोड परिसरातील ४० हून अधिक सेवा वस्त्यांमध्ये ‘सेवा आरोग्य फाउंडेशन’ने आरोग्याचा वटवृक्ष उभा केला आहे. संस्थेच्या माध्यमातून आज वस्त्यांमध्ये ३१ साप्ताहिक अल्पमूल्य दवाखाने यशस्वीपणे चालवले जात असून, त्याद्वारे हजारो गरजूंना तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळतात.केवळ औषधेच नव्हे,तर ८० हून अधिक प्रशिक्षित ‘आरोग्य मैत्रिणींच्या’ मदतीने वस्तीतील महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत आहे.’घे भरारी’ किशोरी विकास प्रकल्पातून शेकडो मुलींचे सक्षमीकरण, ‘सांगाती’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि ‘समृद्धी वर्गातून’ मुलांवर संस्कार करण्याचे काम अविरत सुरू आहे. याशिवाय ‘कै. दादासाहेब जतकर केंद्रा’द्वारे आजवर १,००० हून अधिक कुटुंबांना विनामूल्य रुग्णोपयोगी साहित्याचा आधार देण्यात आला आहे. कोरोना काळात ३५हजाराहून अधिक नागरिकांना शिधा पुरवून मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने वस्तीपातळीवर आरोग्याचे एक यशस्वी आणि पारदर्शक मॉडेल उभे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments